लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : आयटीआयमधून व्यवसाय प्रशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना देश-विदेशांत नोकरीच्या संधी उपलब्ध आहेत. म्हणूनच आयटीआय प्रवेशाच्या अर्जात यंदा घट झाली असली तरी गुणवंतांनी आपला कल आयटीआयकडे असल्याचे सिद्ध केले आहे. राज्यातील १०० टक्के मिळविलेल्या तब्बल १०५ विद्यार्थ्यांनी आयटीआय प्रवेशासाठी अर्ज केल्याची माहिती व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाकडून गुरुवारी जाहीर करण्यात आलेल्या तात्पुरत्या यादीवरून समोर आले आहे.
यंदा राज्यात शासकीय आयटीआयमध्ये ९३ हजार, तर खासगी आयटीआयमध्ये ५५ हजार अशा एकूण १ लाख ४८ हजार जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. यासाठी राज्यभरातून २ लाख ८८ हजार ५८८ विद्यार्थ्यांनी अर्जनोंदणी केली असून, २ लाख ५८ हजार १२० विद्यार्थ्यांनी ती निश्चित केली आहे. या उपलब्ध जागांसाठी ९५ ते ९९ टक्के गुण असणाऱ्या तब्बल १२७ विद्यार्थ्यांनी, ९० ते ९५ टक्के गुण असणाऱ्या १ हजार ११९ विद्यार्थ्यांनी, तर ८५ ते ९० टक्के गुण असणाऱ्या तब्बल ४ हजार ५१७ विद्यार्थ्यांनी नोंदणी केल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे कमी गुण असलेले विद्यार्थी ‘आयटीआय’कडे वळतात, हे चित्र आता बदलत असल्याचे सिद्ध होत आहे अशी प्रतिक्रिया व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी यांनी दिली.
आयटीआयसाठी अर्ज केलेल्या पहिल्या १०० विद्यार्थ्यांमध्ये मुलींचे प्रमाणही चांगले आहे. या विद्यार्थ्यांची अंतिम गुणवत्ता यादी येत्या शनिवारी, ४ सप्टेंबर रोजी जाहीर होणार आहे. प्रवेश प्रक्रियेतंर्गत जाहीर केलेल्या प्राथमिक गुणवत्ता यादीबाबत हरकती नोंदविणे आणि प्रवेश अर्जातील माहितीत बदल करण्यासाठी शुक्रवारी सायंकाळी पाच वाजेपर्यंत मुदत आहे.
एकूण नोंदणी : २,८८, ५८८
अर्ज पूर्णपणे भरलेले : २, ६४, ५१७
प्रवेश अर्ज शुल्क भरलेले : २,५८,५६९
पर्याय सादर केलेले अर्ज : २,४१,६७८
अर्जात दुरुस्ती केलेले : १३, ५५३
----------
जिल्हानिहाय अर्ज
विभाग - अर्ज नोंदणी - अर्ज निश्चित
अमरावती - ४७६५९- ४६५८१
औरंगाबाद - ५६७४९- ५५२१६
मुंबई - ३७००७- ३६१४०
नागपूर - ३४९५८- ३४१९९
नाशिक - ४३९६३- ४३०५३
पुणे - ४३६९९- ४२३९१
----
मुंबई विभागाची तालुकानिहाय आकडेवारी
तालुका - अर्ज नोंदणी - अर्ज निश्चिती
मुंबई शहर - २९५३- २८२१
मुंबई उपनगर - ३६३८- ३५३९
पालघर - ५६६५-५५३७
रायगड- ७५६२- ७४१६
रत्नागिरी - ४२९९- ४२५०
सिंधुदुर्ग-२२५१- २२२६
ठाणे - १०६३९- १०३५१