प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याकडे पालकांचा कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:04 AM2021-07-12T04:04:38+5:302021-07-12T04:04:38+5:30

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना आता शाळा प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याची उत्सुकता ...

The tendency of parents to actually start school | प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याकडे पालकांचा कल

प्रत्यक्षात शाळा सुरू करण्याकडे पालकांचा कल

Next

मुंबई : राज्यातील कोरोनाचा प्रादुर्भाव ओसरत असताना शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांना आता शाळा प्रत्यक्षात कधी सुरू होणार, याची उत्सुकता लागली आहे. दरम्यान, एससीईआरटीकडून शाळा सुरू करण्यासंदर्भात पालकांच्या मतांची चाचपणी एका सर्वेक्षणातून सुरू आहे. शुक्रवारपासून सुरू झालेल्या या सर्वेक्षणात २४ तासांतच राज्यातील दोन लाखांहून अधिक पालकांनी या सर्वेक्षणाला प्रतिसाद दिला आहे. शनिवारी रात्री नऊपर्यंत या सर्वेक्षणात सहभागी झालेल्या ८३ टक्क्यांहून अधिक पालकांनी आपल्या मुलांना कोरोना प्रादुर्भाव कमी झाल्यावर शाळांनी स्वच्छता आणि सुरक्षिततेची योग्य काळजी घेतल्यास आपल्या मुलांना शाळेत पाठविण्यास संमती दर्शविली आहे. मात्र, अद्यापही १६ टक्क्यांहून अधिक पालकांनी यासाठी नकार दर्शविल्याची माहिती समोर आली आहे.

हे सर्वेक्षण १२ जुलैपर्यंत सुरू राहणार असून, अधिकाधिक पालकांनी आपली मते नोंदविण्याचे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे. शनिवारी सायंकाळपर्यंत एससीईआरटीकडून घेण्यात येणाऱ्या सर्वेक्षणात ग्रामीण भागातून १४०४२४ पालकांनी, निमशहरी भागातून २७९६५ पालकांनी, तर शहरी भागातून १००७२७ पालकांनी आपली मते नोंदविली असल्याची माहिती शिक्षण विभागाकडून देण्यात आली.

दरम्यान, यामध्ये शाळेत पाठविण्यास संमती दर्शविणाऱ्या पालकांची संख्या २२४४५१ इतकी होती, तर इच्छुक नसणाऱ्या पालकांची संख्या ४४६६५ इतकी होती. नेटवर्कची अनिश्चितता, अभ्यासात येणारे अडथळे, स्मार्टफोन, लॅपटॉप, संगणकसारख्या सुविधांची कमतरता यामुळे ऑनलाइन शिक्षणात खूप व्यत्यय येत असल्याच्या प्रतिक्रिया पालक व्यक्त करीत आहेत.

सर्वेक्षणात ग्रामीण भागातील पालकांचा सहभाग हा ८८.३२ टक्के, तर शहरी भागातील पालकांचा सहभाग ७७. ६८ टक्के असल्याचे दिसून आले. निमशहरी भागातील पालकांनी १० टक्के सहभाग दर्शविला आहे. ऑनलाइन शिक्षणाचा सर्वाधिक फटका हा ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना बसत आहे. यापुढील काळामध्ये विद्यार्थ्यांचे नुकसान टाळायचे असेल, तर शाळा सुरू करण्याशिवाय पर्याय नाही, असा प्रवाह आता निर्माण झाला असून, योग्य ती काळजी घेऊन शाळा सुरू कराव्यात, अशी मागणी या पालकांकडून केली जात आहे.

असे नोंदवा मत “एससीईआरटी’तर्फे लिंकद्वारे ऑनलाइन सर्वेक्षण केले जात असून, त्यामध्ये कोरोनाविषयक उपाययोजना करून शाळा सुरू झाल्यास मुलांना शाळेत पाठविण्याची पालकांची तयारी आहे का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे. http://www.maa.ac.in/survey या लिंकद्वारे पालक आणि शिक्षकांना आपली मते नोंदविता येणार असून, १२ जुलै रोजी रात्री ११.५५ वाजेपर्यंत सर्वेक्षण सुरू राहणार आहे.

Web Title: The tendency of parents to actually start school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.