लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे कल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2021 04:06 AM2021-05-26T04:06:19+5:302021-05-26T04:06:19+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित अशा अभ्यासक्रमांना शालेय अभ्यासक्रमात जास्तीत जास्त स्थान मिळायला हवे, त्यातही प्रोडक्ट इंजिनिअरिंग, ...

Tendency of students towards technical education curriculum during lockdown period | लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे कल

लॉकडाऊन काळात विद्यार्थ्यांचा तंत्रशिक्षण अभ्यासक्रमाकडे कल

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई

तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित अशा अभ्यासक्रमांना शालेय अभ्यासक्रमात जास्तीत जास्त स्थान मिळायला हवे, त्यातही प्रोडक्ट इंजिनिअरिंग, डेटा अनॅलिटीक्स, कोडिंग यांसारख्या नव्या युगातील अभ्यासक्रमांना महत्त्व देऊन त्यांचा समावेश अभ्यासक्रमात करण्यात यावा, अशी मते आणि प्रतिक्रिया विद्यार्थी नवीन अभ्यासक्रमासंदर्भातील आराखडा आणि त्यात काय, कशाचा समावेश असावा, यासंदर्भात व्यक्त करत आहेत. तंत्रज्ञानविषयक किंवा संबंधित अभ्यासक्रमाचा शालेय शिक्षणात समावेश असायला हवा, असे मत देशातील जवळपास ७२ टक्के विद्यार्थी व्यक्त करत आहेत. ब्रेनली या ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्ममार्फत करण्यात आलेल्या देशभरातील जवळपास २००० हून अधिक विद्यार्थ्यांच्या सर्वेक्षणात शालेय शिक्षणातही विद्यार्थ्यांचा कल पारंपरिक विषयांपेक्षा तांत्रिक शिक्षणाो अभ्यासक्रम शिकण्याकडे जास्त असल्याचे दिसून आले.

ब्रेनली या संस्थेने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिवसाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांमध्ये तंत्रज्ञान आधारित अभ्यासाची आवड जाणून घेण्यासाठी देशातील विविध भागात हे सर्वेक्षण केले होते. दरम्यान, आजच्या काळात कोणत्याही शाखेसाठी तंत्रज्ञान शिकणे अनिवार्य झाले असल्याचे मत ४७ टक्के विद्यार्थ्यांनी नमूद केले आहे. तसेच ५२ टक्के विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञानात करिअर करण्याची इच्छा व्यक्त केली. सर्वेक्षणाला प्रतिसाद दिलेल्या विद्यार्थ्यांपैकी फक्त ३० टक्के विद्यार्थ्यांनी तंत्रज्ञान सोडून करिअरच्या इतर पर्यायांना पसंती दिली. तंत्रज्ञान आणि कौशल्याधारित अभ्यासक्रमात कोडिंग शिकणे, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बिग डेटा आणि इतर तंत्रज्ञानविषयक संकल्पना शिकण्यात ५९ टक्के विद्यार्थ्यांना विशेष आवड असल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

देशात अजूनही लॉकडाऊन असताना शिकण्याच्या बाबतीत भारतीय विद्यार्थ्यांनी कोणतीही संधी गमावलेली नसून, निम्म्यापेक्षा जास्त म्हणजे जवळपास प्रतिसाद दिलेल्यापैकी ५४ टक्के विद्यार्थ्यांनी लॉकडाऊनदरम्यान त्यांनी तंत्रज्ञानसंबंधी अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला आहे. हे अभ्यासक्रम शिकण्यासाठी विविध ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सची विद्यार्थ्यांना खूप मदत झाल्याची माहिती त्यांनी दिली. सगळ्यात जास्त हे अभ्यासक्रम शिकण्यासाठी युट्युबचा सगळ्यात जास्त वापर केला गेला, त्यानंतर अनेक अभ्यासक्रम विद्यार्थी ऑफलाइन ही शिकले असल्याचे त्यांनी नमूद केले. जवळपास १५ टक्के विद्यार्थ्यांनी पालकांची मदत घेतली तर ८ टक्के विद्यार्थीमित्र आणि समवयस्करांवर अवलंबून असल्याचे विद्यार्थ्यांनी सर्वेक्षणात सांगितले.

कोट

वास्तविक जगातील उदाहरणे देत शिकवल्यास तंत्रज्ञान उत्तम पद्धतीने शिकता येऊ शकते. तंत्रज्ञानविषयक संकल्पना शिकण्यास भारतातील अनेक विद्यार्थ्यांनी आवड दाखविणे म्हणजे विद्यार्थी डिजिटल भवितव्याकडे वाटचाल करत असल्याच्या पाऊलखुणा आहेत. त्यामुळे शाळा आणि महाविद्यालयांनीही तंत्रज्ञानाच्या वापरासाठी, त्यांना अनुकूल वातावरणासाठी प्रयत्न करून विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानावर आधारित दृष्टिकोन अंगिकारण्यासाठी प्रोत्साहन देणे गरजेचे आहे.

- राजेश बिसाणी , मुख्य उत्पादन अधिकारी , ब्रेनली संस्था

Web Title: Tendency of students towards technical education curriculum during lockdown period

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.