ठाणे : इथेनॉल बसखरेदीसाठी ठाणे महापालिकेकडून १५ मार्चपर्यंत निविदा मागविण्यात आल्या असून त्या १८ मार्च रोजी उघडण्यात येणार आहेत. आता हे कंत्राट पुन्हा वादग्रस्त सिटी लाइफलाइनच्या घशात जाऊ नये, याकरिता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार हस्तक्षेप करणार का आणि त्याकरिता भाजपाचे स्थानिक लोकप्रतिनिधी तसा आग्रह धरणार का, असा सवाल यानिमित्त उपस्थित झाला आहे.ठाणेकरांना चांगली सेवा देण्यासाठी ठाणे महापालिकेने इथेनॉलवरील नवीन बस खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र यापूर्वी परिवहन सेवेमध्ये जेएनएनयुआरएम अंतर्गत दाखल झालेल्या १९० बसेस चालविण्याचे कंत्राट दिल्लीतील सिटी लाइल लाइनला दिले आहे. त्याकरिता प्रति कि.मी.चा मंजूर दर हा नवी मुंबईपेक्षा अधिक असल्याचा मुद्दा उपस्थित झाल्यानंतर आणि असेसेमेंट रिपोर्टमध्ये देखील संबधींत ठेकेदाराला देण्यात येत असलेले रेट हे अधिकचे असल्याचे सूचित करण्यात आले असतांनाही त्यालाच हे कंत्राट देण्यात आले. त्यानंतर आता पुन्हा इथेनॉल बसचे कंत्राटही याच कंपनीला मिळावे म्हणून पालिकेतील सत्ताधारी पक्षाने जोरदार फिल्डींग लावली आहे. यासाठी पालिकेने निविदाही मागिवल्या आहेत. यामध्ये सिटी लाइफ लाइन, स्कॅनिया व बाफना (मोर्टस) यांनी निविदा भरल्या आहेत. परंतु हे कंत्राट सिटी लाइफलाच मिळावे यासाठी पालिकेतील सत्ताधारी पक्षाचे काही नेते व काही अधिकाऱ्यांनी जोरदार फिल्डींग लावली होती. या बस खरेदीच्या निविदा प्रक्रियेचा पर्दाफाश ‘लोकमत’ने केल्यानंतर महापालिका प्रशासन खडबडून जागे झाले. त्यावेळी महापालिका निवडणुकीचे वातावरण असल्याने त्यांनी या प्रक्रियेला एक आठवड्याची मुदतवाढ देऊन वेळ मारुन नेली. मात्र आता निवडणुकीची धामधूम संपल्यावर पुन्हा सत्ताधारी व काही अधिकाऱ्यांची अभद्र युती सिटी लाइफलाईनचे कंत्राट रेटण्याचा प्रयत्न करु लागले आहे. (प्रतिनिधी) भाजपा विरोध करणार?१येत्या १५ मार्चपर्यंत या निविदा स्विकारल्या जाणार असून १८ मार्च रोजी या निविदा खुल्या केल्या जाणार आहेत. त्यामुळे आता हे कंत्राट मिळविण्यासाठी इतर कंपन्यांनाही निविदा भरण्याची मुभा आहे. या निविदेतील अटी आणि शर्तींमध्ये कोणत्याही प्रकारचा बदल सुचविण्यात आलेला नाही. आता ही बस खरेदी कुणाकडून होणार त्याचा निर्णय १८ मार्चलाच होणार आहे. २महापालिका निवडणुकीत सत्ताधारी शिवसेनेच्या विरोधात भाजपाने पारदर्शकतेचा मुद्दा उपस्थित केला होता. आता त्याच भूमिकेची पाठराखण करीत भाजपा त्यांच्या वाढलेल्या संख्याबळाच्या आधारे सिटी लाइफलाईला हे काम देण्यास विरोध करणार की, बहुमताच्या बळावर निर्णय रेटू पाहणाऱ्या शिवसेनेच्या सूरात सूर मिसळणार, असा सवाल ठाणेकर करीत आहेत. शिवसेना व भाजपा यांनी या कंत्राटाबाबत छुपी युती केली तरी ठाणे महापालिकेचे कर्तव्यदक्ष आयुक्त संजीव जयस्वाल हे पालिकेचे आर्थिक नुकसान करणारा कोणताही निर्णय होऊ देणार नाहीत, असा विश्वास ठाणेकर व्यक्त करीत आहेत.
इथेनॉल बसखरेदीच्या निविदा १८ मार्चला उघडणार
By admin | Published: March 09, 2017 1:17 AM