सात जुलैला जेनेरिक औषधालयासाठी निविदा, एसटी महामंडळाचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2018 12:32 AM2018-07-06T00:32:22+5:302018-07-06T00:32:30+5:30
राज्यातील प्रवाशांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अखेर ७ जुलैला निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे.
मुंबई : राज्यातील प्रवाशांना स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत यासाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने अखेर ७ जुलैला निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. यापूर्वी काढलेल्या निविदा प्रक्रियेस प्रतिसाद न मिळाल्यामुळे महामंडळाकडून अटी-शर्ती शिथिल करून घोषणेच्या दोन वर्षांनंतर पुन्हा एकदा स्थानकावरील जेनेरिक औषधालयासाठी निविदा प्रक्रियेला सुरुवात करण्यात येणार आहे. एसटी स्थानकांमध्ये जेनेरिक औषधालय सुरू करण्यात न आल्याबाबत लोकमतने वृत्त प्रसिद्ध करून हा विषय लावून धरला होता.
‘गाव तेथे एसटी’ या तत्त्वानुसार एसटी महामंडळाच्या राज्यातील ५६८ एसटी स्थानकांवर स्वस्त दरात औषधे उपलब्ध व्हावीत, यासाठी महामंडळाने सर्व एसटी स्थानकांवर जेनेरिक औषधालय सुरू करण्याचा निर्णय डिसेंबर २०१६ मध्ये घेतला होता. मात्र महामंडळाच्या अटी-शर्ती जाचक असल्याने याला प्रतिसाद मिळाला नाही. दोन वर्षे झालेल्या या विलंबाबात लोकमतने २४ जूनच्या अंकात ‘एसटी स्थानके
जेनेरिक औषधांच्या प्रतीक्षेत’
या मथळ्याअंतर्गत वृत्त प्रसिद्ध केले होते.
परिवहनमंत्री आणि एसटी महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी जून महिन्यात महामंडळाचे उपाध्यक्ष रणजीत सिंह देओल यांना या प्रकरणी लक्ष घालून तातडीने अटी-शर्ती शिथिल करून निविदा प्रक्रियेस सुरुवात करण्यास सांगितले होते. त्यानुसार जेनेरिक औषधांसाठी तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. परवानाधारकाची नियुक्ती करण्यासाठी ७ जुलै रोजी राज्यातील सर्व एसटी स्थानकांवर जेनेरिक औषधालयासाठी निविदा महामंडळाच्या संकेतस्थळावर उपलब्ध होणार असल्याचे महामंडळाच्या नियोजन व पणन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
- प्रधानमंत्री भारतीय जन औषधी योजनेंतर्गत राज्यातील एसटी स्थानकात जेनेरिक औषधालय सुरू करण्यात येणार आहे. बाजारातील ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा जेनेरिक औषधे सुमारे ४० टक्क्यांहून कमी किमतीमध्ये उपलब्ध होतात. ही योजना सुरू झाल्यास लाखो प्रवाशांना स्वस्त दरात औषधे मिळतील. राज्यातील सुमारे ८० टक्के प्रवाशांचे एसटी हेच प्रवासासाठीचे साधन आहे. तर राज्यातील १६ हजारपेक्षा जास्त एसटीमधून रोज ७० लाख प्रवासी प्रवास करतात.