एकत्रित तिकीट पद्धतीसाठी मागविल्या निविदा
By admin | Published: January 1, 2016 01:45 AM2016-01-01T01:45:48+5:302016-01-01T01:45:48+5:30
उपनगरीय रेल्वे, मेट्रो, मोनो आणि बसेसचे तिकीट एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत.
मुंबई : उपनगरीय रेल्वे, मेट्रो, मोनो आणि बसेसचे तिकीट एकाच ठिकाणी उपलब्ध व्हावीत, यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सल्लागाराची नेमणूक करण्यासाठी निविदा मागविल्या आहेत. मुंबईसह महानगर क्षेत्रात, एकत्रित तिकीट पद्धत राबविल्यास प्रवासासाठी तिकिटे विकत घेणे सुकर होणार आहे, तसेच टोल देणेही सोपे होणार आहे.
उपनगरीय रेल्वे प्रवासासाठी प्रवाशांना तिकिटासाठी कित्येक वेळ रांगेमध्ये उभे राहावे लागते. त्यामुळे प्रवाशांचा वेळ वाया जातो. प्रवाशांच्या वेळेचा अपव्यय टाळण्यासाठी मेट्रो, मोनो, उपनगरीय रेल्वे आणि बसेसची तिकिटे तातडीने उपलब्ध करून देण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. एकत्रित तिकीट पद्धतीमार्फत ही सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्राधिकरणाने सल्लागार नेमणुकीसाठी निविदा मागविल्या आहेत. सल्लागाराची नेमणूक झाल्यानंतर सल्लागाराला एकत्रित तिकीट पद्धतीची बांधणी व तंत्र यांना अंतिम स्वरूप देणे, यापूर्वी पूर्ण करण्यात आलेले अभ्यास अहवाल यांचा आढावा घेणे व ते अद्यायावत करणे, निविदा प्रक्रिया हाताळणे आणि प्रकल्पाची यशस्वी अंमलबावणी करणे अशा विविध जबाबदाऱ्या सल्लागारास पार पाडाव्या लागणार आहेत.
सल्लागार नेमणुकीसाठी विनंतीवजा प्रस्ताव १२ फेब्रुवारीपर्यंत सादर करता येणार असून, निविदापूर्व बैठक २१ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आली आहे.
वेळेचा अपव्यय टळणार
मुंबईकरांना रोजच्या धावपळीत आवश्यक असणारे छोटे आर्थिक व्यवहार करताना होणारा वेळेचा अपव्यय या पद्धतीमुळे टाळता येणार असल्याचे, प्राधिकरणाचे सहप्रकल्प संचालक जनसंपर्क दिलीप कवठकर यांनी सांगितले. विविध प्रकारच्या वाहतुकीसाठी उपयुक्त अशा या पद्धतीमुळे रांगेत उभे राहण्याचा त्रास आणि सुट्या पैशांवरून निर्माण होणारे वाद टाळता येणार असल्याचेही कवठकर म्हणाले.