मुंबई : कांजूरमार्ग येथील मेट्रो सहाच्या कारशेडच्या उभारणीसाठी आवश्यक असलेल्या विविध कामांच्या निविदा प्रक्रिया सुरू असून, या डेपोतील ट्रॅकसाठी आवश्यक असलेले ट्रॅक पुरवठ्याचे काम जिंदाल स्टील अँड पावर लि. या कंपनीला मिळाले. मात्र, तीनच्या कारशेडसाठी कांजूरमार्ग येथील जागा देण्याच्या मुद्द्यावरून राज्य आणि केंद्र सरकारमध्ये संघर्ष उभा ठाकल्याने, या ठिकाणच्या मेट्रो सहाच्या कारशेडचे भवितव्यही टांगणीला लागले आहे. त्यामुळे निविदा प्रक्रियेत पात्र ठरले तरी तूर्त जिंदालला वर्क ऑर्डर मिळणे अवघड आहे.दिल्ली मेट्रो रेल काॅर्पोरेशन (डीएमआरसी) यांनी दिल्लीतील पाच आणि मुंबईतील एका मेट्रो डेपोसाठी निविदा प्रसिद्ध केल्या होत्या. त्यांचे वित्तीय देकार नुकतेच उघडण्यात आले असून, ही सर्व कामे करण्यासाठी जिंदाल स्टील कंपनी पात्र ठरली. पुढील १२ महिन्यांत ही सामग्री कारशेडच्या कामासाठी पुरवायची आहे, परंतु मेट्रो सहाच्या प्रस्तावित कारशेडच्या मार्गातही विघ्न उभे ठाकले आहे. त्यामुळे कारशेड उभारणीच्या कामांसाठी काढलेल्या निविदा प्रक्रिया स्थगित कराव्या लागतील, अशी चिन्हे आहेत.स्वामी समर्थनगर ते विक्रोळी या १५.१८ किमी लांबीच्या मेट्रो सहा प्रकल्पाचे काम एमएमआरडीएने हाती घेतले आहे. मेट्रो मार्गिकेच्या उभारणीचे काम तीन टप्पांत देण्यात आले आहे. आयआयटी पवई ते विक्रोळी (जे कुमार), पवई ते श्यामनगर (एमबीझेड) आणि श्यामनगर ते स्वामी समर्थनगर (जे. कुमार) या तीन टप्प्यांत १३ स्टेशनची उभारणी केली जात आहे. या मार्गिकेसाठी कांजूरमार्ग येथील जागा पूर्वीच निश्चित करण्यात आली असून, त्याबाबत कोणताही वाद नव्हता. मात्र, आता मेट्रो तीनचे कारशेड आरे काॅलनीतून कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयानंतर नवा वाद सुरू झाला आहे.
..त्यानंतरच भूमिका स्पष्ट हाेईलमेट्रो तीनचे कारशेड आरे काॅलनीतून कांजूरमार्ग येथे स्थलांतरित करण्याचा निर्णय झाल्यानंतर, त्यावर केंद्र सरकारने आपला अधिकार सांगितला. त्यामुळे निर्माण झालेला पेच सुटल्यानंतरच मेट्रो सहाच्या कारशेडबाबतची भूमिका स्पष्ट होईल, असे एमएमआरडीएतल्या सूत्रांनी सांगितले.