मुंबई : विरार ते अलिबाग बहुउद्देशीय मार्गिकेच्या निविदांना मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे कंत्राटदारांना १२ मार्चपर्यंत निविदा दाखल करता येणार आहेत, अशी माहिती राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) अधिकाऱ्यांनी दिली.विरार ते अलिबाग दरम्यान १२८ किमीचा बहुउद्देशीय वाहतूक मार्ग एमएसआरडीसी उभारणार आहे. मुंबईतील प्रवेश नियंत्रित असा हा पहिलाच महामार्ग असणार आहे. या मार्गामधोमध १३६ किमी लांबीची मेट्रो मार्गिका उभारण्याचेही प्रस्तावित आहे. पहिल्या टप्प्यात वसईतील राष्ट्रीय महामार्ग ८ वरील नवघर येथून हा मार्ग सुरू होईल तो पेण तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग ६६ वरील बलावली गावादरम्यान उभारला जाईल.
या महामार्गासाठी सुमारे ६० हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. यामध्ये भूसंपादनाच्या सुमारे २२ हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा समावेश आहे.
एमएसआरडीसीने जानेवारीमध्ये निविदा मागविला होत्या. मात्र, कंत्राटदारांनी या निविदा दाखल करण्यासाठी वेळ मागितला होता. त्यानुसार एमएसआरडीसीने वाढीव मुदत दिली आहे.
काय आहेत वैशिष्ट्ये ?
१) एकूण आठ लेनचा रस्ता (प्रत्येकी चार लेन)
२) रस्त्याच्या मध्यभागी मेट्रो मार्गिका प्रस्तावित.
३) जेएनपीटी बंदर, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि एमटीएचएल जोडणार.
४) मुंबई-दिल्ली कॉरिडॉर आणि विरार-अलिबाग बहुद्देशीय मार्गिका हे काही भागात एकत्रित जाणार.