विकासकामांमध्ये कंत्राटदारांना झुकते माप; कॅगच्या अहवालात ठपका
By ऑनलाइन लोकमत | Published: March 26, 2023 06:06 AM2023-03-26T06:06:07+5:302023-03-26T06:06:13+5:30
शिवाय ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणे वापर केल्याचे ‘कॅग’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.
मुंबई : महापालिकेने कोरोना काळासह नंतरच्या कालावधीत केलेल्या वेगवेगळ्या विभागांत विनानिविदा कामे दिली असून, अनेक कामांसाठी उर्वरित विभागांच्या परवानग्या घेतलेल्या नाहीत. विविध प्रकल्पांत कंत्राटदारांना झुकते माप देण्यात आल्याने महापालिकेचे नुकसान झाले आहे. परिणामी, ‘कॅग’ने कारभारावर ताशेरे ओढत कामात महापालिकेत पारदर्शकतेचा अभाव आहे. शिवाय ढिसाळ नियोजन आणि निधीचा निष्काळजीपणे वापर केल्याचे ‘कॅग’ने आपल्या अहवालात म्हटले आहे.
‘कॅग’च्या अहवालात निरीक्षणे नोंदविण्यात आली असून, त्या निरीक्षणानुसार महापालिकेने २ विभागांची २१४.४८ कोटींची २० कामे टेंडर न काढता दिली. ४ हजार ७५५.९४ कोटींची कामे एकूण ६४ कंत्राटदार आणि महापालिका यांच्यात करार नसल्याने एक्झिक्युट झाली नाही. करार नसल्याने महापालिकेला कारवाईचा अधिकार नाही. ३ हजार ३५५.५७ कोटींच्या ३ विभागांच्या १३ कामांमध्ये थर्ड पार्टी ऑडिटरची नियुक्ती नाही. त्यामुळे कामे कशी झाली, हे पाहणारी यंत्रणा नाही. रस्ते आणि वाहतूक विभागांत ५६ कामांचा अभ्यास करण्यात आला असून, ५२ पैकी ५१ कामे कुठलाही सर्व्हे न करता निवडली गेली.
५४ कोटींची कामे निविदा न मागविता जुन्या कामांना जोडण्यात आली. संगणकीकृत अहवालात हस्ताक्षराने नोंदी घेण्यात आल्या. कंत्राटदारांना १ कोटींचा लाभ देण्यात आला. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान येथील बोगद्याचे काम करताना वन विभागाची अंतिम मान्यता न घेतल्याने जानेवारी १९ पासून ऑगस्ट २२ पर्यंत याची किंमत ४ हजार ५०० कोटींहून ६ हजार ३२२ कोटींवर गेली. परेल टीटी फ्लाय ओव्हरचे अतिरिक्त काम निविदा न मागविता दिले गेले.
चार कामे एकाच कंत्राटदाराला
माहिती तंत्रज्ञान विभागात सॅप प्रणालीबाबत १५९ कोटींचे कंत्राट निविदा न मागविताच पूर्वीच्याच कंत्राटदाराला देण्यात आले. यासाठी वर्षाकाठी ३७ कोटी देखभाल दुरुस्तीसाठी दिले. मात्र, या बदल्यात कोणत्याही सेवा नाहीत, हे नुकसान आहे. पूल विभागाने मान्यता नसताना अतिरिक्त कामे दिली. कंत्राटदाराला झुकते माप दिले गेले. मिठी नदी प्रदूषण नियंत्रण करताना जुलै २०१९ मध्ये ४ विविध कामे ४ कंत्राटदारांना २४ महिन्यांच्या कालावधीत दिली गेली, असे म्हटले जात असले तरी प्रत्यक्षात ४ ही कामे एकाच कंत्राटदाराला दिली गेली. अशा अनेक बाबींहून कॅगने महापालिकेच्या कारभारावर ताशेरे ओढले आहेत.