लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई - मागील तीन वर्षांपासून नवोदितांना संधी देत त्यांना आपले कलागुण सादर करण्यासाठी हक्काचे व्यासपीठ देणारे सृजन - द क्रिएशन विजय तेंडुलकर आणि अभिराम भडकमकर यांची नाटके घेऊन आले आहे. तेंडुलकरांचे 'मित्राची गोष्ट' आणि भडकमकरांचे 'ज्याचा त्याचा प्रश्न' दोन नाटके ख्रिसमसच्या अगोदर रसिकांच्या भेटीला येणार आहेत.
बोरिवली येथील श्रीकृष्ण नगरातील अॅक्टिव्हीटी सेंटरमध्ये २३ ते २६ डिसेंबर या काळात 'मित्राची गोष्ट' आणि 'ज्याचा त्याचा प्रश्न' या नाटकांचे प्रत्येकी पाच प्रयोग सादर केले जाणार आहेत. अभिनेता-दिग्दर्शक राजेश देशपांडे यांच्या सृजनमधील कलाकारांनी मागील तीन वर्षात जवळपास २५ एकांकिका, पाच दीर्घांक, पाच दोन अंकी नाटके, अनेक अभिजात नाटकांचे अभिवाचन आणि शॉर्ट फिल्म्स केल्या आहेत. बऱ्याच प्रतिष्ठित स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळवले आहेत. सृजन द क्रिएशनच्या कलाकारांनी राज्यनाट्य स्पर्धेत तीन नाटके सादर केली. अभिराम भडकमकर लिखित ‘ज्याचा त्याचा प्रश्न’ या नाटकाला साहित्य संघ केंद्रातून प्रथम क्रमांक मिळाला. प्रथम क्रमांक पटकावणारे हे नाटक आता रसिकांनाही पाहता येणार आहे.