Join us

अतिक्रमणांवरील कारवाईवरून दिघ्यात तणाव

By admin | Published: October 06, 2015 5:13 AM

कडेकोट पोलीस बंदोबस्तात एमआयडीसीने आज दिघ्यातील दोन इमारतींवर कारवाई केली. या कारवाईला विरोध करणाऱ्या सुमारे दीडशे रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेऊन

नवी मुंबई : कडेकोट पोलीस बंदोबस्तात एमआयडीसीने आज दिघ्यातील दोन इमारतींवर कारवाई केली. या कारवाईला विरोध करणाऱ्या सुमारे दीडशे रहिवाशांना पोलिसांनी ताब्यात घेऊन सायंकाळी सोडून दिले. याशिवाय माजी महापौरांसह जवळपास २५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. दिघ्यातील ९९ बेकायदा इमारतींवर कारवाई करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. त्यानुसार एमआयडीसी प्रशासनाने मागील आठवड्यापासून टप्प्याटप्प्याने कारवाई मोहीम सुरू केली आहे. शिवराम अपार्टमेंट, पार्वती निवास आणि केरू प्लाझा या तीन इमारतींवर कारवाई करण्यासाठी एमआयडीसीचे पथक कडेकोट पोलीस बंदोबस्तात आज सकाळी दिघ्यात दाखल झाले. मात्र या कारवाईला विरोध करीत परिसरातील रहिवासी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरले. विशेष म्हणजे या आंदोलनात शालेय विद्यार्थ्यांनाही उतरविण्यात आल्याने वातावरण आणखीनच तणावग्रस्त बनले. या प्रकरणी पोलिसांनी मुख्याध्यापक व पालकांवर कारवाई करण्याचे संकेत दिल्याने विद्यार्थ्यांना परत पाठविण्यात आले. दुपारनंतर पोलिसांनी जमावाला पांगविण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी पोलिसांची जादा कुमक मागविण्यात आली. शेवटी साडेतीन वाजण्याच्या सुमारास पोलिसांनी आंदोलकांची धरपकड सुरू केली. महिला व पुरुषांसह सुमारे दीडशे रहिवाशांना ताब्यात घेण्यात आले. त्यानंतर शिवराम अपार्टमेंट व पार्वती निवास या दोन इमारतींवर बुलडोझर फिरविण्यात आला. ही कारवाई सुरू असताना काही आंदोलकांनी ठाणे-बेलापूर मार्गावर रास्तारोको करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, कारवाईला विरोध करणाऱ्या राष्ट्रवादीच्या आजी - माजी नगरसेवकांसह २५ जणांना नोटिसा बजावण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. (प्रतिनिधी)