मुंबई - शहरातील धारावी परिसरात असणाऱ्या अनधिकृत मशिदीचा काही भाग तोडण्यावरून तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. याठिकाणी शेकडो नागरीक रस्त्यावर उतरले आहेत. पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. तोडक कारवाईसाठी आलेल्या मुंबई महापालिकेच्या वाहनांचीही तोडफोड झाल्याची माहिती समोर आली आहे. धारावी पोलीस स्टेशनबाहेर लोकांची गर्दी जमली आहे.
आज सकाळी साडे नऊ वाजता अनधिकृत मशिदीचा काही भाग पाडण्यासाठी बीएमसीचं पथक धारावीत दाखल झाले. त्याला विरोध करण्यासाठी शेकडोचा जमाव तिथे पोहचला. जमावाने बीएमसी वाहनांच्या काचा फोडल्या तर काहींनी धारावीतील रस्ता अडवला. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत या परिसरातील बंदोबस्त वाढवला. त्यानंतर लोकांचे शिष्टमंडळ आणि पालिका अधिकारी यांच्यात पोलीस स्टेशनमध्ये संवाद करण्यात येत आहे. धारावीत ठिकठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात केला आहे.
तर ही मशिद ६०-६० वर्ष जुनी आहे. नुकतेच ३-४ वर्ष नुतनीकरण झाले आहे. काही बीएमसीचे अधिकारी मशिद तोडण्यासाठी आले, संविधानाने आम्हाला अधिकार दिलाय, अनधिकृत मशिद म्हणून तोडायला आलेत, तर धारावी पूर्ण अनधिकृत आहे, अनेक झोपड्या अनधिकृत आहेत. वांद्रे इथं अनधिकृत आहे. जर तुम्हाला काही अडचण असेल तर आधी त्यांच्यावर कारवाई करा. आम्ही नमाज पठण कुठे करायचे, धर्मस्थळावर थेट हल्ला का करताय, आमची आस्था आहे. निवडणुकीच्या वेळी अशाप्रकारे मुद्दे करून मतांचे ध्रुवीकरण केलं जातंय असा आरोप इथल्या जमावातील एकाने केला.
आश्वासनानंतरही बुलडोझर पाठवला - खासदार वर्षा गायकवाड
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आश्वासनानंतरही आज मुंबई महापालिकेने बुलडोझर पाठवून तडक कारवाई सुरू केली आहे. धारावीतील लोकांच्या भावना दुखावू नयेत म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांना रात्री उशिरा भेटून या कारवाईला थांबवण्याची विनंती केली होती. मी पुन्हा एकदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महापालिका आयुक्तांना विनंती करते, धारावीमध्ये सामाजिक सलोखा आणि शांततेचे वातावरण राखण्यासाठी ही कारवाई स्थगित करण्यात यावी. सर्व धारावीकर शांतता राखण्यासाठी झटत आहेत. आम्ही प्रशासन आणि पोलिसांशी सतत संपर्कात आहोत. धारावीच्या सामाजिक एकतेला धक्का पोहोचणार नाही याची काळजी घेणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे अशी प्रतिक्रिया खासदार वर्षा गायकवाड यांनी दिली आहे.
कायदा कुणीही हातात घेऊ नये
प्रशासनाने जर कारवाई केली असेल तर त्याची माहिती घेतली पाहिजे. अनधिकृत बांधकामाबाबत कारवाई असेल तर ती समजून घेतली पाहिजे. अनधिकृत बांधकामामुळे अनेक अडचणी निर्माण होतात. कायदा कुणी हातात घेऊ नये. महाराष्ट्र हे कायद्याचे राज्य आहे असं मंत्री उदय सामंत यांनी केले आहे.
दरम्यान, जातीजातीत तेढ वाढवले जातायेत, हिंदू राहील किंवा मुस्लीम राहील असा तेढ भाजपा आमदार करतायेत. गुण्यागोविंदाने धारावी विकसित करायची असेल तर त्याच्यांशी संवाद साधायला हवा असं विधान ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केले.