मुंबई : भाजपकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप करत उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे कार्यकर्ते आक्रमक झाले. त्यांनी, भाजप यांच्या वॉर रूममध्ये धाव घोषणाबाजी सुरू केल्याने गोंधळ उडाला. आरोपानंतर उद्धव सेना आणि भाजप कार्यकर्ते समोर समोर आल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करण्याची वेळ ओढवली. मुलुंड परिसरात सायंकाळी सहाच्या सुमारास भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या कार्यकर्त्यांकडून त्यांच्या वॉर रूममध्ये पैसे वाटप आणि मोजणे सुरू असल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी थेट कोटेचा यांचे मुलुंडमधील सोशल वॉर रूम गाठले. पैसे वाटपाची तक्रार येताच निवडणूक अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले आहे. कार्यकर्त्यांनी इमारतीबाहेर घोषणाबाजी सुरू केल्या. निवडणूक अधिकाऱ्यांनी वॉर रूम झाडाझडती घेत चौकशी सुरू असल्याचे सांगितले. कर्मचारी हातात काही रोकड घेवून खाली येत असताना पाटील यांच्या कार्यकर्त्यांनी त्यांना प्रवेशद्वारात अडवले. त्यांच्या हातातील पैसे पाहून आणखीन गोंधळ वाढला. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय जोशी यांच्यासह बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनाही धक्काबुक्की झाली. त्यानंतर इमारतीतून काही कार्यकर्ते बाहेर येताच हेच पैसे वाटत असल्याचा आरोप करत कार्यकर्ते त्यांच्या मागे धावले. तो कार्यकर्ता कोटेचा यांच्या कार्यालयात शिरला. कार्यकर्त्यांनी कोटेचा यांचे कार्यालयाबाहेर घोषणाबाजी सुरू केल्या.
या घटनेने परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. शिवाजी पार्क येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा असल्याने कोटेचा यांच्यासह पदाधिकारी कार्यकर्ते शिवाजी पार्क येथे होते. सायंकाळी हळूहळू माहिती वाऱ्यासारखी पसरताच दोन्ही उमेदवारांच्या कार्यकत्यांनी मुलुंडमध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली. जवळपास शेकडो कार्यकत्यांचा जमाव येथे धडकल्याने पोलीस उपायुक्त पुरुषोत्तम कराड यांनी स्वतः घटनास्थळी थांबवून परिस्थिती हाताळण्याचा प्रयत्न केला. परिस्थितीवर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला आहे.
भाजप पदाधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार काहीही सापडले नसून खोटे आरोप करत असल्याचे म्हटले. तर, उद्धव सेनेच्या कर्यकत्यांच्या म्हणण्यानुसार याठिकाणी दोन लाखांची रोकड सापडली असून आतमध्ये आणखीन पैसे असल्याचा आरोप केला. रात्री १० नंतर काही उद्धव ठाकरे गटाच्या काही कार्यकर्त्यांनी ताब्यात घेतले.
चौकशी सुरूपैसे वाटप होत असल्याची तक्रार येताच वॉर रुमची पाहणी केली, तेव्हा दोन लाखांची रोकड मिळून आली, याबाबत चौकशी सुरू असल्याचे निवडणूक अधिकाऱ्याने सांगितले.
भाजप कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजीपोलिसांनी मध्यस्थी घेतल्यानंतर उद्धव ठाकरे गटाचे कार्यकर्ते निघून गेले आहे. भाजपा कार्यकर्त्यांनीही संजय पाटील यांच्या विरोधात घोषणाबाजी सुरू केल्या आहे. उपमुख्य मंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रात्री कोटेचा यांच्या कार्यालयात पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून परिस्थितीचा आढावा घेतला.
पराभवाच्या भीतीने भेकड हल्लासंजय दिना पाटील यांनी पराभवाच्या भीतीपोटी आम्ही सगळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभेत असताना हा भेकड हल्ला केला आहे. आमच्या वॉर रूमच्या, कार्यालयाच्या काचा तोडण्यात आल्या आहे. कर्मचाऱ्यांना मारहाण झाली. याचा मी तीव्र निषेध करतो. पाटील यांचे अवैध धंदे, गुटका, मटका सगळे बंद करणार. आजच्या प्रकाराबाबत पोलिसांत तक्रार देण्यात येत आहे.- मिहिर कोटेचा, भाजप उमेदवार, मुंबई उत्तर पूर्व
माहिती देणाऱ्यावरच कारवाईमिहिर कोटेचा यांच्या वॉर मधून पैसे वाटप होत असल्याचे कार्यकत्यांना समजताच त्यांनी निवडणूक अधिकारी आणि पोलिसांना कळवले. निवडणूक अधिकारी आल्यानंतर कार्यकत्यांना प्रवेशद्वारातच अडवल्यामुळे गोंधळ झाला. तसेच, भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना मारहाण केली. माहिती देणाऱ्यावरच पोलीस कारवाई करत आहे. हे चुकीचे आहे. - संजय दिना पाटील, महाविकास आघाडी उमेदवार
५० ते ६० कोटी असल्याचा संशयकोटेचा यांच्या या वॉर रूम मधून मोठ्या प्रमाणात पैसे वाटप होत असल्याचे समजतच आम्ही निवडणूक कर्मचाऱ्यांना कळवले. त्यांनी आमच्यापैकी काही जणांना आत मध्ये न नेताच किरकोळ रक्कम खाली घेवून आले. तसेच याप्रकरणात शिवाजी पार्कची सभा सोडून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येतात म्हणजे याठिकाणी ५० ते ६० कोटी असल्याचा संशय असून यंत्रणांनी सविस्तर तपास करत योग्य ती कारवाई करत हे पैसे जनतेसमोर आणायला हवे.- सुनील राऊत, आमदार, विक्रोळी