राणेंवरून युतीमध्ये तणाव; शिवसेनेचा तीव्र विरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 31, 2019 05:11 AM2019-08-31T05:11:39+5:302019-08-31T05:12:01+5:30

मुख्यमंत्री करणार उद्धव ठाकरेंशी चर्चा

Tensions in the coalition from the rane; Strong opposition from Shiv Sena | राणेंवरून युतीमध्ये तणाव; शिवसेनेचा तीव्र विरोध

राणेंवरून युतीमध्ये तणाव; शिवसेनेचा तीव्र विरोध

googlenewsNext

विशेष प्रतिनिधी ।
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना भाजपमध्ये प्रवेश देण्यास आणि त्यांचा पक्ष भाजपमध्ये विलिन करण्यास शिवसेनेने तीव्र विरोध दर्शविला आहे. त्यामुळे १ सप्टेंबरला महाजनादेश यात्रेत राणेंचा पक्ष भाजपमध्ये विलिन होण्यावर प्रश्नचिन्ह लागले आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून मन वळवतील, असे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.


शिवसेना सोडून गेलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ हे शिवसेनेच्या वाटेवर आहेत. केवळ नाशिकमधील शिवसेनेच्या नेत्यांनी कडाडून विरोध दर्शविल्यामुळे त्यांचा शिवसेना प्रवेश अडला आहे. एकीकडे भुजबळांना पक्षात घेण्यास ‘मातोश्री’ अनुकूल असताना दुसरीकडे राणे यांना भाजपनेही सामावून घेऊ नये असा उद्धव ठाकरे यांचा आग्रह असल्याचे समजते. भाजपचे राज्यसभा सदस्य असले तरी राणे आणि त्यांच्या मुलांनी भाजपत प्रवेश न करता स्वत:च्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे अस्तित्व कायम ठेवले आहे. आता विधानसभा निवडणुकीच्या तोेंडावर पक्ष विलिन करून नितेश व निलेश यांना आमदार करण्याचा राणेंचा प्रयत्न आहे.



नारायण राणे भाजपमध्ये गेले आणि युतीही कायम राहिली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात त्यांच्या एका मुलास जरी भाजपने उमेदवारी दिली तर राणेंसाठी प्रचार करण्याची वेळ शिवसेनेवर येणार आहे. हे कदापिही शक्य नसल्याचे शिवसेनेच्या सूत्रांनी स्पष्ट केले. राणेंना भाजपत घेण्यास शिवसेनेचा विरोध असल्याचे मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावरून स्पष्ट झाले. शिवसेनेला विश्वासात घेतल्याशिवाय राणेंबाबत निर्णय घेतला जाणार नाही, असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितले.


अमित शहा मातोश्रीवर जाणार का?
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा हे २ सप्टेंबर रोजी दिवसभर मुंबईत असतील. या मुंबई भेटीत ते मातोश्रीवर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतील का या बाबत उत्सुकता आहे. शहा हे दरवर्षी मुंबईत गणेशोत्सवात दर्शनासाठी येतात आणि त्यानुसार त्यांची हे भेट असल्याचे भाजपच्या सूत्रांनी सांगितले.


जयकुमार गोरेंचा आमदारकीचा राजीनामा
सातारा जिल्ह्यातील माण खटावचे काँग्रेस आमदार जयकुमार गोरे यांनी विधानसभा सदस्यत्वाचा राजीनामा आज विधानसभा अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे सादर केला. गोरे हे १ सप्टेंबरला सोलापूर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेत भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

महाडिक, रामराजे १ सप्टेंबरला भाजपमध्ये
विधान परिषदेचे सभापती रामराजे निंबाळकर, कोल्हापूरचे माजी खासदार राष्ट्रवादीचे धनंजय महाडिक, माजी मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते पद्मसिंह पाटील व त्यांचे पुत्र राणा जगजितसिंह पाटील हे नेते १ सप्टेंबरला मुख्यमंत्री फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोपाच्या सभेत भाजपमध्ये प्रवेश करतील हे निश्चित झाले आहे.
भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यावेळी उपस्थित असतील. साताराचे खासदार उदयनराजे भोसले यांचा भाजप प्रवेशाचा मुहूर्त अद्याप ठरलेला नाही. आज त्यांना या बाबत विचारले असता त्यांनी नेमके उत्तर देण्याचे टाळले.

Web Title: Tensions in the coalition from the rane; Strong opposition from Shiv Sena

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.