दहावीचे टेन्शन खल्लास...!

By admin | Published: April 1, 2017 06:49 AM2017-04-01T06:49:10+5:302017-04-01T06:49:10+5:30

आयुष्यातील पहिली बोर्डाची परीक्षा म्हणजे दहावी. दहावीला मिळालेल्या गुणांवर पुढचे करिअर अवलंबून असते.

Tenth admission of tenth ...! | दहावीचे टेन्शन खल्लास...!

दहावीचे टेन्शन खल्लास...!

Next

मुंबई : आयुष्यातील पहिली बोर्डाची परीक्षा म्हणजे दहावी. दहावीला मिळालेल्या गुणांवर पुढचे करिअर अवलंबून असते. त्यामुळे आताच्या स्पर्धेच्या युगात दहावी आणि त्याचबरोबरीने गुणांना अधिकच महत्त्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकही ताणाखाली असतात. वर्षभर सतत अभ्यास, क्लासेस हेच सुरू असते. अनेक घरांत टीव्ही, खेळ बंद केलेला असतो. पण आता दहावीची परीक्षा संपलेली आहे. त्यामुळे या दहावीच्या विद्यार्थ्यांनी सुटकेचा नि:श्वास टाकला आहे. हे विद्यार्थी आता सुट्टीत काय करणार, याविषयी जाणून घेतले आहे...

दहावीचा अभ्यास संपला आहे. त्यामुळे आता रिलॅक्स वाटते आहे. आता सुट्टीचे प्लॅनिंग सुरू केले आहे. यामध्ये मित्र-मैत्रिणींबरोबर फिरायला जायचे आहे. सध्या मुंबईतल्या मुंबईत जायचे प्लॅनिंग आहे. वॉटर किंगडमला जायचा प्लान केला आहे. त्यानंतर गावी जायचे आहे. पुढे कॉमर्सला जाणार आहे, त्यामुळे जास्त टेन्शन नाही. पण थोडे शिकायचे, एमएस-सीआयटी करायचे आहे.
- सिद्धार्थ पवार, आर.सी. पटेल इंग्लिश मिडियम स्कूल, बोरीवली

दहावीच्या वर्षात अभ्यास आणि क्लासेसमुळे खूप मजा-मस्ती करायची राहून गेली आहे. आता मी परीक्षा संपल्यापासून एकदम टेन्शन फ्री झाले आहे. त्यामुळे आता मी सुट्टीत नातेवाइकांकडे जाणार आहे. माझ्या भावंडांबरोबर वेळ घालवणार आहे. त्यांच्याबरोबर धम्माल मस्ती करायची आहे. पुढे काय करायचे हा विचार मी केलेला नाही. त्यामुळे आता आई-वडील निर्णय घेतील.
- नगमा शेख,
सेंट मेरी हायस्कूल, मीरा रोड

सुट्टी आताच सुरू झाली आहे. पण पेपर खूपच चांगले गेले असल्यामुळे आता निकालाचीही आतुरतेने वाट पाहत आहे. सध्या सुट्टीचे प्लॅनिंग म्हणजे मैत्रिणींसोबत धम्माल करायची आहे. बाहेर फिरायला पण जायचे आहे. पण यापेक्षा काही तरी वेगळे करायचे आहे. यात महत्त्वाचे म्हणजे आतापर्यंत जे मी शिकले नाही ते शिकून घ्यायचे आहे. काय ते अजून ठरवले नाही.
- नम्रता निग्रोसे, शरॉन इंग्लिश हायस्कूल, मुलुंड (पूर्व)

दहावीची परीक्षा संपल्याने मी खूप खूश आहे. आता सुट्ट्यांचा मी सदुपयोग करून घेणार आहे. मला इंग्रजी बोलायला शिकायचे आहे. त्यामुळे इंग्लिश स्पिकिंगचा क्लास लावणार आहे. कॉम्प्युटर पण शिकायचा आहे. त्याचबरोबर इतर क्लास लावायचे आहेत. माझ्या भविष्याला उपयोगी असणारे अन्य स्किल्स पण मला शिकून घ्यायचे आहेत.
- ऋषिकेश माने,
विदर्भ विद्या मंदिर, मालाड

दहावीची सुट्टी ही वेगळी आणि मोठी असते, या सुटीत वेगळे करायचे आहे. मी या सुट्टीत जॉब करायचा आहे. मला आधीपासूनच फॅशन इंडस्ट्रीमध्ये पुढे जायचे आहे. पण शालेय अभ्यासक्रमात याचा अभ्यास झालेला नाही. म्हणून फॅशन डिझाइनचा कोर्स करायचा आहे. पण या कोर्सबरोबरच खूप सारे फिरायचे आहे. मैत्रिणींबरोबर धम्माल मस्ती करायची आहे.
- खुशी संपत, जे.बी. खोत हायस्कूल, बोरीवली

परीक्षा, अभ्यास यामुळे वर्ष टेन्शनमध्ये गेले आहे. आता मी फ्री झालो आहे. सुट्टीत मित्रांसोबत आता मी खूप क्रिकेट खेळणार आहे. गेल्या वर्षभरात खेळायला मिळाले नव्हते. याचबरोबर गावी पण जायचे आहे. गावाबरोबरच अजून दुसऱ्या ठिकाणी फिरायला जायचे आहे. महत्त्वाचे म्हणजे मजा करण्यासाठी स्वत:चा पॉकेटमनी हवा आहे. त्यामुळे कुठे तरी समर जॉबही शोधणार आहे.
- प्रशांत सागरे, नूतन विद्या महाराष्ट्र विद्यालय, गोरेगाव

दहावीची परीक्षा संपल्याने मला आनंद झालाच आहे. पण खरा आनंद हा गावाला जायला मिळणार याचा आहे. गेल्या वर्षभरात अभ्यास केला आहे. त्या वेळी बाहेर जायला मिळाले नव्हते. आता फिरायला मिळणार आहे. दहावीच्या निकालानंतर मी कॉमर्सला जाणार हे ठरलेले आहे. त्यामुळे जास्त
ताण घेणार नाही. सुट्टी एन्जॉय करणार.
- अक्षता वाडकर, चिकित्सक विद्यालय, गिरगाव

दहावीनंतर खऱ्या अर्थाने करिअरची सुरुवात होते. त्यामुळे दहावीच्या सुट्टीत मजा मस्ती करणार आहेच. पण कॉम्प्युटर क्लासही लावणार आहे. सध्या सर्व ठिकाणी कॉम्प्युटर येणे आवश्यक आहे. त्यामुळे तो क्लास करणार असून त्याचबरोबर ‘पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट’चा क्लासही करायचा आहे आणि नक्कीच मे महिन्यात गावाला जायचे आहे.
- कल्पना येडगे, हिल्डा कॅस्टेलिनो मराठी हायस्कूल, कांदिवली

Web Title: Tenth admission of tenth ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.