Join us

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना जवळच्या परीक्षा केंद्रांवर द्यावी परीक्षेची मुभा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2021 4:07 AM

कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात २९ एप्रिल ते २१ मे दहावीची आणि २३ एप्रिल ...

कनिष्ठ महाविद्यालयीन संघटनेची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात २९ एप्रिल ते २१ मे दहावीची आणि २३ एप्रिल ते २१ मे बारावीची बोर्डाची ऑफलाइन परीक्षा होईल. कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्रास होऊ नये म्हणून शिक्षण विभागाकडून विशेष बाब म्हणून विद्यार्थ्यांच्या शाळा व कनिष्ठ महाविद्यालये हीच परीक्षा केंद्रे येणार असल्याचे नियोजन केले आहे; मात्र कोरोनाचा संसर्ग आणि रुग्णसंख्या वाढत आहे, त्याचप्रमाणे लॉकडाऊनची भीती ही विद्यार्थी शिक्षकांना आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना त्यांचे होम सेंटर हे परीक्षा केंद्र देण्याऐवजी त्यांच्या राहत्या पत्त्याजवळ असणारे शाळा किंवा महाविद्यालय हे परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे किंवा तेथे त्यांना परीक्षा देण्याची मुभा द्यावी, असे नियोजन करावे, अशी मागणी कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाकडून करण्यात आली आहे.

वर्षभर पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांप्रमाणे दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनीही ऑनलाइन शिक्षणच घेतले आहे; मात्र आता लॉकडाऊनच्या भीतीने अनेक पालक स्थलांतरित होत आहेत. आधीच्या वर्षात आर्थिक परिस्थिती हलाखीची झाल्याने अनेकांनी नोकऱ्याही गमावल्या आहेत. त्यामुळे अनेक जण आपल्या मूळ गावीही परतले आहेत. आता त्यांना पुन्हा शहरात येऊन परीक्षा देणे शक्य नसल्याने यंदा त्या विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकण्याची भीतीही निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे अनेक विद्यार्थ्यांची बारावीची महाविद्यालये ही घराजवळ नसून, घरापासून दूर अंतरावर आहेत. वर्षभर शाळा, महाविद्यालये बंद असल्याने विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अभ्यास केला; मात्र परीक्षा देण्यासाठी त्यांना लोकलने जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागणार आहे. सुरक्षिततेच्या दृष्टीने हे त्यांच्यासाठी घटक ठरण्याची भीती पालकांना वाटत आहे. अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांना ते कुठेही असतील तरीही जवळच्याच केंद्रावर परीक्षा देण्याची मुभा मिळेल, अशी सोय शिक्षण विभागाने करावी, अशी मागणी राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन महासंघाचे समन्वयक मुकुंद आंधळकर यांनी केली आहे.

दहावी, बारावीच्या परीक्षा नियोजनानुसारच

दरम्यान, पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना वर्गोन्नती देण्याचा निर्णय जाहीर करण्यात आल्यानंतर शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दहावी व बारावीच्या परीक्षा या नियोजित वेळापत्रकानुसार ऑफलाइन पद्धतीनेच होणार असल्याचे पुन्हा स्पष्ट केले. ऑफलाइन पद्धतीने परीक्षा होणार असल्या तरीही विद्यार्थ्यांच्या २५ टक्के अभ्यासक्रमात कपात, स्वतःचेच शाळा, कनिष्ठ महाविद्यालय परीक्षा केंद्र, ज्या विद्यार्थ्यांना कोविड-१९ संसर्ग झाल्यास किंवा इतर आपत्कालीन कारणामुळे परीक्षा देता येणार नाही, त्यांना जूनमधील परीक्षांची संधी अशा विशेष सवलती देण्यात आल्याचे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.