दहावीचे २ विद्यार्थी परीक्षेला मुकले; केंद्रावर उशिरा आल्याचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 05:19 AM2018-03-03T05:19:47+5:302018-03-03T05:19:47+5:30
मुंबई विभागीय मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेत येण्याचा सल्ला दिल्यानंतरही, विविध कारणांनी पहिल्याच पेपरला ११ विद्यार्थी उशिराने आल्याची माहिती आहे.
मुंबई : मुंबई विभागीय मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेला वेळेत येण्याचा सल्ला दिल्यानंतरही, विविध कारणांनी पहिल्याच पेपरला ११ विद्यार्थी उशिराने आल्याची माहिती आहे. त्यात हार्बर मार्गावर झालेला खोळंबा व इतर समाधानकारक कारणांमुळे उशिरा आलेल्या, ९ विद्यार्थ्यांना परीक्षेला बसू देण्याचा निर्णय केंद्र संचालक आणि मंडळाने घेतला. मात्र, असमाधानकारक उत्तरे देणाºया २ विद्यार्थ्यांना परीक्षेस मुकावे लागल्याची माहिती मंडळाने दिली आहे.ऐन होळीच्या दिवशी हार्बर मार्गावरील ओव्हरहेड वायर तुटल्याने, दहावीच्या पहिल्याच पेपरला पोहोचण्यास ६ विद्यार्थ्यांना उशीर झाला. नियमानुसार, सकाळी ११ वाजल्यानंतर १० मिनिटांनी उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना केंद्र संचालक, तर २० मिनिटे उशिरा येणाºया विद्यार्थ्यांना विभागीय मंडळाच्या परवानगीने परीक्षेला बसण्याची परवानगी दिली जाते. त्यानुसार, लोकल खोळंब्याने उशीर झालेल्या ६ व इतर महत्त्वाच्या कारणांमुळे उशिरा आलेल्या ३ अशा एकूण ९ विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्याची परवानगी देण्यात आली. याउलट २ विद्यार्थ्यांना काहीच कारण नसताना उशिराने आल्यामुळे पहिल्याच पेपरला मुकावे लागले.
दरम्यान, मुंबई विभागीय मंडळाच्या पालघर जिल्ह्यामधील शाळेतील परीक्षा केंद्रामधील एका विद्यार्थ्याचा अपवाद वगळता, इतर ठिकाणी कॉपीची प्रकरणे समोर आलेली नाहीत.
>दहावीच्या विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू
प्रभादेवी येथे राहणाºया ऋत्विक घडशी या दहावीच्या विद्यार्थ्याचा गुरुवारी पहाटे मृत्यू झाला. रात्री उशिरा अभ्यास करून झोपल्यानंतर ऋत्विक उठलाच नाही. त्यानंतर, झोपेतच त्याला हृदयविकाराचा झटका आला. ऋत्विकला त्वरित केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी मृत घोषित केले.दहावीत शिकणारा ऋत्विक हा आई आणि दोन बहिणींसह प्रभादेवीतील आदर्शनगर परिसरात राहत होता. परळच्या केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अविनाश सुपे म्हणाले की, ऋत्विकला गुरुवारी पहाटे रुग्णायलात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला होता. हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. डॉक्टरांनी सांगितल्यानुसार, एवढ्या लहान वयात हृदयविकाराचा झटका येणे ही दुर्मीळ गोष्ट आहे. ऋत्विकचे मामा प्रकाश जावळे म्हणाले, बेशुद्ध अवस्थेत ऋत्विकला रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापूर्वीच त्याचे निधन झाले होते. शवविच्छेदन अहवालानंतरच त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळू शकेल, असेही त्यांनी सांगितले.