Join us

९ ऑगस्टपासून शाळांमध्ये मिळणार दहावीची गुणपत्रिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 4:07 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : १५ जुलै रोजी राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : १५ जुलै रोजी राज्य शिक्षण मंडळाचा दहावीचा निकाल ऑनलाइन पद्धतीने जाहीर करण्यात आला होता. आता ९ ऑगस्टपासून विद्यार्थ्यांना त्यांच्या दहावीच्या निकालाच्या गुणपत्रिका शाळांमधून देण्याचे निर्देश शिक्षण मंडळाकडून देण्यात आले आहेत. यासाठी विभागीय मंडळाकडून ७ ते ९ ऑगस्टदरम्यान गुणपत्रिका शाळांना देण्यात येणार आहेत.

शाळांनी विद्यार्थ्यांच्या गरजेनुसार आणि सोयीनुसार व कोविड संबंधित शासनाने, आरोग्य विभागाने दिलेल्या सूचनांचे पालन करत शाळांनी या गुणपत्रिकांचे वाटप करायचे आहे. तसेच कोणत्याही विद्यार्थ्याला शाळा गुणपत्रिका ठरविलेल्या दिवशीच घेऊन जाण्यासाठी आग्रह करू शकणार नाही याबाबतीत स्पष्टताही मंडळाकडून देण्यात आली आहे.

निकालाचे गुणपत्रक व तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख शाळांना वितरित करण्यासाठी विभागीय सचिवांना राज्य शिक्षण मंडळाकडून सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक वितरण केंद्राला जोडलेल्या शाळांची संख्या लक्षात घेऊन ज्यादा वितरण केंद्रांची व्यवस्था विभागीय मंडळांनी करावी तसेच वितरण केंद्रावर सुरक्षित अंतर ठेवून वितरण खिडक्यांची संख्या वाढवून गुणपत्रिकांचे शाळांना हस्तांतरण करण्यात यावे, असेही सूचित केले आहे. ७ ऑगस्ट ते ९ ऑगस्ट या २ दिवसांच्या दरम्यान विभागीय मंडळांनी ही कार्यवाही करायची असून गुणपत्रिका वितरणासाठी वितरण केंद्रावर स्थायी लिपिक व शिपाई पाठविण्याबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना शिक्षण मंडळाकडून देण्यात आल्या आहेत.