दहावी, बारावीची परीक्षा जूनमध्ये किंवा त्यानंतरच घ्यावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2021 04:05 AM2021-04-11T04:05:58+5:302021-04-11T04:05:58+5:30
सर्वेक्षणातील निष्कर्ष; ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांचे मत लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी, बारावीची ऑफलाइन ...
सर्वेक्षणातील निष्कर्ष; ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांचे मत
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : काेराेनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने दहावी, बारावीची ऑफलाइन परीक्षा जून महिन्यात किंवा त्यानंतर घ्यावी, असे मत ६९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी मांडले आहे.
दहावी, बारावीच्या परीक्षेसंदर्भात राज्य शिक्षक परिषदेकडून राज्यातील पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांचे ऑनलाइन सर्वेक्षण करण्यात आले. यात २,६०० हून अधिक शिक्षक, विद्यार्थी सहभागी झाले हाेते. सध्याच्या वाढत्या काेराेना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर तब्बल ४२.२ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी जूनमध्ये, तर ३३.१ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी जुलै महिन्यात परीक्षा घ्यावी, असे मत मांडले. एकूण ६९.३ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी सध्यस्थितीत परीक्षा घेण्यास विराेध दर्शविला. तर, २४.७ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी परीक्षा आहेच त्याच नियोजनाप्रमाणे एप्रिल, मे महिन्यातच घ्याव्यात, असे मत मांडले. या सर्वेक्षणात राज्यातील सर्व जिल्ह्यांतील, विशेषतः मुंबईतील सर्वाधिक शिक्षक, विद्यार्थ्यांनी सहभाग नाेंदवला.
यात राज्यातील ४५.५ टक्के शिक्षकांनी, तर ४०.७ टक्के विद्यार्थ्यांनी मते मांडली. सर्वेक्षणात पालकांचा सहभाग ११.७ टक्के हाेता, तर इतर व्यावसायिक आणि अन्य आहेत. दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलाव्या का, या प्रश्नावर ६९.३ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी त्या पुढे ढकलाव्या, अशी मागणी केली आहे. ३०.७ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी परीक्षा पुढे ढकलू नयेत, असे मत सर्वेक्षणात नोंदविले.
याशिवाय दहावी, बारावीच्या परीक्षा पुढे ढकलल्याने विद्यार्थ्यांचे माेठे शैक्षणिक नुकसान होईल का, या प्रश्नावर ३८.१ टक्के शिक्षक, विद्यार्थ्यांनी नुकसान होईल, असे मत मांडले. तर तब्बल ६१.९ टक्के विद्यार्थी, शिक्षकांनी शैक्षणिक नुकसान होणार नसल्याचे मत नोंदविले. एकंदर सार्वजनिक आरोग्यासह शिक्षक, विद्यार्थी व पालकांच्या आरोग्याला प्राधान्य देऊनच परीक्षा व्हाव्यात, अशी भूमिका शिक्षक परिषदेकडे मांडण्यात आली. त्यामुळे विद्यार्थी, पालक, शिक्षकांच्या मतांचा आदर करून निर्णय घ्यावा, अशी मागणी राज्य शिक्षक परिषदेने शिक्षण विभाग तसेच मुख्यमंत्र्यांकडे केल्याचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी सांगितले.
कोट
सुरक्षेला प्राधान्य देऊन सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांना कोविड प्रतिबंधक लस देणे, विद्यार्थ्यांची आरटीपीसीआर तपासणी करणे आणि परीक्षा केंद्रांवर वैद्यकीय पथकाची नियुक्ती करून आवश्यक ती सर्व वैद्यकीय साधने उपलब्ध केल्यानंतरच परीक्षा घेण्यात याव्यात, अशी मागणी शिक्षक परिषदेने यापूर्वी शासनाकडे केली आहे. परंतु सध्याची वाढती कोविड रुग्णसंख्या पाहता विद्यार्थ्यांच्या आराेग्याच्या दृष्टीने तसेच कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये हीच भूमिका आमची आहे.
- शिवनाथ दराडे,
कार्यवाह, राज्य शिक्षक परिषद
......................