Join us

दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा संमिश्र पद्धतीने व्हावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2021 4:06 AM

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धती क्लासरूम शिकवण्या ते ऑनलाइन शिकवण्यामध्ये बदलली, मग त्याचप्रमाणे दहावी बारावीच्या ...

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण पद्धती क्लासरूम शिकवण्या ते ऑनलाइन शिकवण्यामध्ये बदलली, मग त्याचप्रमाणे दहावी बारावीच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल का केले जात नाहीत? असा प्रश्न उपस्थित करत दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांनी शालेय शिक्षणमंत्री वर्ष गायकवाड यांच्याकडे काही मागण्या केल्या आहेत. यासाठी त्यानी इंडिया वाइड पॅरेण्ट असोसिएशनमार्फत निवेदन दिले असून राज्यातील ग्रामीण व शहरी भागातील सर्व विद्यार्थ्यांचा परीक्षा ऑनलाइन व ऑफलाइन दोन्ही पद्धतीने घेण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थी करत आहेत. सोबतच ऑफलाइन परीक्षा झाल्यास ५० गुणपरीक्षेला व ५० गुण अंतर्गत मूल्यमापनाला अशी गुण विभागणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यानी केली आहे.

दहावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा २१ मे ते १० एप्रिल, तर बारावीच्या २२ मे ते १० एप्रिल दरम्यान होणार आहेत. दहावीचे १६ लाख, तर बारावीचे १४ लाख विद्यार्थी राज्यातून परीक्षा देणार आहेत. त्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव व रुग्णसंख्या वाढत असताना जे विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. परीक्षेदरम्यान दोन विषयांच्या पेपरमध्ये पुरेसे अंतर ठेवून बोर्डाने त्यांचे नियोजन करावे, बारावीसाठी कोणत्याही ५ परीक्षांपैकी ४ विषय सोडविण्याची मुभा द्यावी, विशेषतः वाणिज्य शाखेसाठी प्रश्नसंचाची सोय करावी अशा मागण्या विद्यार्थ्यांनी निवेदनात मांडल्या आहेत. शिक्षण विभागाने दहावी बारावी परीक्षांसाठी २५ टक्के अभ्यासक्रम कपात केली आहे. मात्र विद्यार्थ्यांची तयारी पाहता त्यात आणखी कपात करावी किंवा मूल्यमापनाच्या पद्धतीत बदल करावेत, असे त्यांनी सुचविले आहे.

विद्यार्थ्यांना आता पुरविण्यात आलेल्या प्रश्नसंचातील प्रश्नामधूनच परीक्षेला येणाऱ्या प्रश्नपत्रिका तयार केल्या जातील याची हमी द्यावी, तसेच प्रात्यक्षिकांचे गुण अंतर्गत मूल्यमापनातूनच द्यावेत असेही नमूद केले आहे. जे विद्यार्थी वसतिगृहांमध्ये राहतात ते वसतिगृहे बंद असल्याने परीक्षा कशी देतील याचाही विचार विभागाने करून निर्णय घ्यावा, असे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे बोर्डांच्या परीक्षासोबत जेईई परीक्षा येत असल्याने विद्यार्थ्यांना दिलासा कसा मिळणार? असे प्रश्न ही त्यांनी उपस्थित केले आहेत.