लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : अर्थसंकल्पाचे आकारमान मोठे असले तरी मुंबई महापालिकेच्या कारभाराचा आवाकाही मोठा आहे. कर्मचाऱ्यांच्या पगारावर एकूण अर्थसंकल्पाच्या ५० टक्के रक्कम खर्च होते ही बाब नवीन नाही. पालिकेच्या विविध कार्यक्रमांवरही घसघशीत पैसे खर्च होत आहेत. कार्यक्रमांचे आयोजन करण्यासाठी यावर्षी अर्थसंकल्पात तब्ब्ल २८६.०६ कोटींची तरतूद केली आहे.
उद्घाटन, भूमिपूजन, शालेय विद्यार्थ्यांच्या स्पर्धा असे उपक्रम वर्षभरात सुरू असतात. यापैकी काही कार्यक्रम भव्यदिव्य केले जातात. त्यासाठी मंडप, स्टेज उभारणी, डेकोरेशन, साऊंड सिस्टीम, निवेदक, निमंत्रण पत्रिका छपाई, खानपान सेवेचे नियोजन केले जाते. त्या सर्वांसाठी मोठ्या प्रमाणावर पैसे लागतात. त्यामुळे आगाऊ तरतूद करावी लागते.
४८८७.६१ कोटी राेजच्या कारभारासाठी
अर्थसंकल्पात महसूल उत्पनाची साधने आणि महसूल खर्चाच्या बाबी यात सांगड घातली जाते. यंदाच्या अर्थसंकल्पात कर्मचारी-अधिकाऱ्यांच्या वेतनासाठी ५० टक्के म्हणजे १४ हजार ७०५ कोटी रुपये तरतूद आहे.
पालिकेचा रोजचा कारभार चालवण्यासाठी ४८८७.६१ कोटी रुपये, प्रशासकीय खर्चासाठी १४४०.१८ कोटी, मालमत्ता करांचा परतावा १७४.५१ कोटी असा खर्च आहे.
असा भागवला जातो खर्च
महसुली उत्पनातून महसुली खर्च भागवला जातो. महसुली उत्पन्नात सर्वात मोठा वाटा आहे तो जकातीपोटी राज्य सरकारकडून मिळणाऱ्या अर्थसाहाय्याचा ! या माध्यमातून १३ हजार ३३१.६३ कोटी रुपये पालिकेला मिळतात. एक प्रकारे कर्मचारी, अधिकाऱ्यांचे वेतन भागविण्यासाठी या रकमेचा मोठा उपयोग होतो. म्हणजे महसुली उत्पनातील ४५ टक्के रक्कम या माध्यमातून मिळते.
विकास नियोजन खात्यातून ५८०० कोटी मिळतात. महसुली उत्पनात हे प्रमाण २० टक्के आहे. मालमत्ता कराची वसुली ढेपाळली तरी १० टक्के रक्कम त्यातून मिळते. रस्ते, पूल या ठिकाणी केली जाणारी जाहिरातबाजी किंवा अन्य वापरातून ५०८.७४ कोटी मिळतात.
रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये ३३७.४९ कोटी गुंतवणुकीवरील व्याज १५५२.३२ कोटी, पर्यवेक्षण आकार १४७० कोटी, लायसन विभाग ३२४.४९ कोटी आणि अन्य प्राप्ती २११२.८५ कोटी असे मिळून महसुली उत्पन्न मिळते २९ हजार ४३१.७३ कोटी रुपये ! तेवढाच महसुली खर्च आहे.
परिणामी ऐनवेळी कोणत्या खात्यातून पैसे वर्ग करायचे, असा प्रश्न येत नाही, असे पालिकेच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. तरीही तब्बल दोनशे कोटी एवढी रक्कम कार्यक्रमांसाठी खर्च होणे हे विशेष !