पोर्ट ट्रस्टवर जलपर्यटनासाठी विमानतळाप्रमाणे टर्मिनल
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 12:50 AM2018-12-13T00:50:36+5:302018-12-13T00:50:55+5:30
रोेपवे, हाईड पार्कद्वारे चेहरामोहरा बदलण्याचा प्रयत्न
मुंबई : सागरमाला प्रकल्पाअंतर्गत मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे पूर्व किनारपट्टीचा चेहरामोहरा बदलण्याची योजना हाती घेण्यात आली आहे. लवकरच इतर प्रलंबित प्रकल्प राबविण्यात येतील. जलपर्यटनासाठी पोर्ट ट्रस्ट महत्त्वाची भूमिका बजावणार असून सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर हा विभाग राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर पर्यटकांच्या आकर्षणाचा मुंबईतील केंद्रबिंदू ठरण्याची शक्यता आहे.
मुंबई पोर्ट ट्रस्टतर्फे तब्बल ४ हजार ५७९ कोटी रुपये खर्चून विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत. आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनलचा कायापालट करण्यात येणार असून विमानतळाप्रमाणे क्रुझ टर्मिनलची निर्मिती करण्यात येणार आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा वापर करून एंटरप्राईज रिसोर्स प्लॅनिंगची अंमलबजावणी करण्यात येईल. त्यामध्ये मुंबई, चेन्नई, कांडला, पॅरादीप, कोलकाता, दीनदयाल पोर्ट व हल्दिया या बंदरांना एकमेकांशी जोडून व्यवसाय सहज व्हावा अशी व्यवस्था तयार करण्यात येत असून त्यासाठी २९७ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
मुंबई ते मांडवा व नेरूळ यादरम्यान रो पॅक्स फेरी सेवा सुरू करण्यात येईल. याद्वारे मालवाहतूक करणारे कंटेनर व खासगी वाहने जलमार्गे मांडवा व नेरूळपर्यंत जाऊ शकतील. त्यामुळे रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होईल, अशी आशा आहे. कुलाबा येथे सागर उपवन गार्डन, ससून डॉकचे अद्ययावतीकरण, बीपीटीचे सुपर स्पेशालिटी रुग्णालय व हाईड पार्कच्या धर्तीवर १४५ हेक्टर जमिनीवर पार्क उभारण्याचे प्रस्तावित आहे. शिवडी व रे रोडच्या मध्ये बनवण्यात येणारे हे पार्क सन २०२२ पर्यंत पूर्ण करण्याचे धेय्य आहे.
देशातील पहिला व सर्वांत लांब रोप वे शिवडी ते एलिफंटा दरम्यान ८ किमी अंतराचा तयार करण्यात येत आहे. त्याची समुद्रसपाटीपासूनची उंची ५० मीटर ते १२५ मीटर असून समुद्रात ८ ते १० टॉवर उभारून त्याला तयार करण्यात येणार आहे. ८०० कोटी खर्च असणारा हा प्रकल्प २०२१ मध्ये पूर्ण होईल. याद्वारे १५ मिनिटांत शिवडी ते एलिफंटा हा प्रवास करता येईल. प्रत्येक केबिनमध्ये २० ते ३५ प्रवासी बसू शकतील. प्रत्येकी ४७५ जणांची क्षमता असलेली दोन तरंगती उपाहारगृहे तयार करण्यात आली आहेत. या सेवेचा औपचारिक प्रारंभ करण्यात आला असून प्रत्यक्षात नियमितपणे ही सेवा लवकरच सुरू होणार आहे. गेट वे आॅफ इंडिया येथे दोन तर गिरगाव चौपाटी येथे एका तरंगत्या उपाहारगृहाची सेवा सुरू करण्यात येणार आहे. मुंबई परिसरातील जलवाहतूक क्षेत्रातील समस्या मार्गी लावण्यासाठी गेट वे आॅफ इंडियापासून १३ नॉटिकल अंतरावर कान्होजी आंग्रे हे बेट वसविण्यात येणार आहे. जहाजांना मार्गदर्शन करण्यासाठी लाइटहाउस व इतर अनुषंगिक सुविधा त्याद्वारे पुरविण्यात येतील.
पोर्ट ट्रस्टच्या जागेवर उभारण्यात येणारे विविध प्रकल्प मुंबईतील नागरिकांना व मुंबईत येणाऱ्या नागरिकांच्या आकर्षणाचे केंद्र बनेल असा विश्वास आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा येथे तयार केल्या जात आहेत. या परिसराचा चेहरामोहरा बदलणारे हे प्रकल्प आहेत. रो पॅक्स सेवा सुरू झाल्यावर रस्ते मार्गावरील ताण कमी होईल. जलमार्गाने दररोज सुमारे एक हजार कंटेनर जातील त्यामुळे रस्ते मार्गाने होणाºया वाहतुकीवरील तेवढा ताण कमी होईल. त्याचप्रमाणे वॉटर टॅक्सी सुरू झाल्यावर रस्त्यावरील खासगी वाहनांची संख्या त्या प्रमाणात कमी होईल. मुंबईतील व देशातील अनेक नागरिक उच्च दर्जाच्या अनेक पर्यटन सुविधांसाठी परदेशवारी करतात त्यांना मुंबईत या सुविधा उपलब्ध करून आपल्याकडे आकर्षित करण्याचा आमचा प्रयत्न आहे व आम्ही त्यामध्ये यशस्वी होऊ.
- संजय भाटीया, अध्यक्ष, मुंबई पोर्ट ट्रस्ट