‘टीस’च्या ११५ शिक्षक-शिक्षकेतरांचा सेवासमाप्तीचा निर्णय मागे
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2024 06:01 AM2024-07-01T06:01:28+5:302024-07-01T06:01:51+5:30
टाटा ट्रस्टकडून निधीचा ओघ सुरू राहणार, ट्रस्टकडून निधी आल्यानंतर या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाणार आहे. यापैकी अनेक जण २००८ पासून संस्थेत कार्यरत आहेत.
मुंबई : टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेसमधील (टीस) ११५ शिक्षक-शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या सेवा समाप्तीचा निर्णय मागे घेण्यात आला आहे.
टाटा ट्रस्टकडून येणारा निधीचा ओघ थांबणार असल्याने या ११५ कर्मचाऱ्यांना २८ जूनला सेवा समाप्तीच्या नोटिसा पाठविण्यात आल्या होत्या. मात्र, या नोटीस रद्द करण्यात आल्या आहेत. सर्व कर्मचाऱ्यांना आपले काम सुरू ठेवण्यास सांगण्यात आल्याची माहिती ‘टीस’च्या कुलसचिवांनी दिली. ट्रस्टकडून निधी आल्यानंतर या कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जाणार आहे. यापैकी अनेक जण २००८ पासून संस्थेत कार्यरत आहेत. यात ५५ प्राध्यापकांचा समावेश आहे. इतर ६० शिक्षकेतर कर्मचारी आहेत.
हे कर्मचारी ‘टीस’च्या चारही कॅम्पसमध्ये कंत्राटी तत्त्वावर कार्यरत आहेत. त्यांच्या कराराचे नूतनीकरण केले जाणार नाही, असे संस्थेकडून सांगण्यात आले होते. त्यामुळे त्यांची सेवा ३० जून रोजी संपुष्टात येणार होती. मात्र, टाटा एज्युकेशन ट्रस्टकडून निधी देण्याबाबत पुन्हा सकारात्मक चर्चा सुरू झाल्याचे ‘टीस’च्या प्रशासनाकडून सांगण्यात आले. या निधीतून या कर्मचाऱ्यांना वेतन दिले जात आहे.
विद्यार्थी संघटनेची मागणी
संस्थेतील प्रोग्रेसिव्ह स्टुडंट्स फोरमने याचा निषेध करत सेवा समाप्तीचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली होती. या कर्मचाऱ्यांचे वेतन केंद्र सरकार आणि विद्यापीठ अनुदान आयोगाने देण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. या संबंधातील वृत्त प्रकाशित झाल्यानंतर ट्रस्टकडून निधी दिला जाणार असल्याचा खुलासा संस्थेकडून करण्यात आला.
राखीव निधीतून वेतन : वेतन निधीबाबत अनेक महिन्यांपासून ‘टीस’ प्रशासनाची टाटा ट्रस्टच्या अधिकाऱ्यांशी चर्चा सुरू होती. ‘टीस’च्या राखीव निधीतून गेल्या महिन्यातील ७५ लाख वेतन देण्यात आले. ट्रस्टकडून काहीच प्रतिसाद न मिळाल्याने अखेर त्यांची सेवा संपविण्याची निर्णय घेण्यात आला होता.