Join us

परिवहन निविदेतील अटी-शर्ती बदलणार

By admin | Published: April 15, 2015 10:51 PM

नव्या २२० बसेसवर आॅपरेटर नियुक्त करण्यासाठी काढलेल्या निविदेला तीन वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नसल्याने या बस दाखल होणे आधीच एक वर्ष लांबले आहे.

ठाणे : ठाणे परिवहनच्या ताफ्यात दाखल होणाऱ्या नव्या २२० बसेसवर आॅपरेटर नियुक्त करण्यासाठी काढलेल्या निविदेला तीन वेळा मुदतवाढ देऊनही प्रतिसाद मिळाला नसल्याने या बस दाखल होणे आधीच एक वर्ष लांबले आहे. त्यामुळे आता या निविदेतील अटी व शर्तींमध्ये बदल करण्याचा निर्णय परिवहन सेवेने घेतला आहे. त्यानुसार, यासंदर्भातील प्रस्ताव २० एप्रिलला होणाऱ्या महासभेत चर्चेसाठी ठेवण्यात आला आहे. ठाणे परिवहन सेवेत आजघडीला ३१३ बस असून त्यातील १७० ते १८० बस रस्त्यांवर धावत आहेत. परंतु, या बस प्रवाशांसाठी अपुऱ्या पडत आहेत. त्यात परिवहनचे उत्पन्नदेखील घटले आहे. त्यामुळे जेएनएनयूआरएमअंतर्गत परिवहनने २२० बस घेण्याचा निर्णय घेऊन त्यातील १५ वातानुकूलित बस ताफ्यात दाखल झाल्या असून उर्वरित १५ बस येत्या काही दिवसांत दाखल होणार आहेत. परंतु, उर्वरित १९० बसेस यादेखील खाजगी ठेकेदाराच्या माध्यमातून चालविल्या जाणार आहेत. ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने प्रति किलोमीटर तत्त्वावर चालविण्यासाठी आणि देखभाल दुरुस्तीसाठी त्या १० वर्षांच्या कालावधीसाठी दिल्या जाणार आहेत. त्यानुसार, यासाठी प्रथम १७ सप्टेंबर २०१४ रोजी निविदा काढण्यात आली होती. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यानंतर, पुन्हा याला दोन वेळा मुदतवाढ देऊनही त्याला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे आता परिवहनने या निविदेत फेरबदल करून त्यातील अटी-शर्ती बदलण्याचा निर्णय घेतला आहे. तरीही निविदेला प्रतिसाद मिळतो कि नाही? हे कोणालाच सांगता येत नाही. (प्रतिनिधी)४पूर्वीच्या निविदेतील व्हॅट रजिस्ट्रेशनची अट वगळण्यात आली आहे. तसेच अनुभवाच्या अटी व शर्तींमध्येदेखील बदल सुचविण्यात आले आहेत. त्यानुसार, आता स्वत:च्या मालकीच्या कमीतकमी ७० बसेस असणे आवश्यक राहणार आहे. ४सरकारी, निमसरकारी उपक्रमांतील कमीतकमी १०० बसेसचा आॅपरेशन अ‍ॅण्ड मेंटनन्स करण्याचा मागील २ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. अथवा, सरकारी, निमसरकारी उपक्रमांतील कमीतकमी २०० बसेसचा मागील ३ वर्षांचा मेंटनन्स करण्याचा अनुभव असणे आवश्यक असणार आहे. ४या तीन अटींपैकी केवळ एका अटीची पूर्तता करणे अपेक्षित धरण्यात आले आहे. त्यानुसार, आता यासंदर्भातील प्रस्ताव येत्या महासभेत मंजुरीसाठी पटलावर ठेवण्यात आला आहे. ४पूर्वीच्या निविदेमध्ये इसारा अनामत रक्कम २२० बसेसच्या खरेदीच्या किमतीवर १ टक्क्यानुसार १.४० कोटी होती. त्यानुसार, यात बदल करून फेरनिविदा १९० बसेसची असून बसच्या खरेदी किमतीच्या १ टक्क्यानुसार १ कोटी इतकी अनामत रक्कम बँक गॅरंटी स्वरूपात असणार आहे. ४या पूर्वीच्या निविदेत सुरक्षा अनामत रक्कम २२० बसेसच्या खरेदी किमतीच्या ५ टक्क्यांप्रमाणे ७ कोटी होती. ती आता १९० बसेसची असून बस खरेदी किमतीच्या ५ टक्क्यांप्रमाणे ४ कोटी ९१ लाख इतकी असणार आहे.४पूर्वीच्या निविदेत अपफ्रंट कॉन्ट्रीब्युशनची रक्कम बस खरेदी रकमेच्या जास्तीतजास्त १५ टक्क्यांपर्यंत याप्रमाणे १८ कोटी ९१ लाख ७१ हजार ५५३ इतकी होती. त्यात बदल करून आता बस खरेदी रकमेच्या ५ टक्क्यांपर्यंत म्हणजेच ४ कोटी ९१ लाख ही डिमांड ड्राफ्टच्या स्वरूपात असणार आहे.