Join us

गच्चीवर रेस्टॉरंट महासभेच्या पटलावर, आयुक्त अडचणीत  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 01, 2017 7:33 AM

गच्चीवर रेस्टॉरंटचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या महासभेपुढे प्रलंबित असताना आयुक्त अजय मेहता यांनी सुधारित धोरण आणून ते तत्काळ मंजूर करून घेतले खरे.

मुंबई : गच्चीवर रेस्टॉरंटचा प्रस्ताव मुंबई महापालिकेच्या महासभेपुढे प्रलंबित असताना आयुक्त अजय मेहता यांनी सुधारित धोरण आणून ते तत्काळ मंजूर करून घेतले खरे. मात्र अद्याप महासभेच्या पटलावर असलेला हा प्रस्ताव चर्चेला येताच तो फेटाळून लावण्याची तयारी विरोधी पक्षाने केली आहे. यात पहारेकरी भाजपानेही साथ दिल्यास हा प्रस्ताव नामंजूर होऊ शकतो. यामुळे आयुक्त अडचणीत येण्याची शक्यता आहे, तर शिवसेनेचा हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पुन्हा बारगळण्याची चिन्हे आहेत.युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या नाइट लाइफ संकल्पनेनुसार गच्चीवर रेस्टॉरंटचा प्रस्ताव तयार झाला. त्यानुसार सन २०१४ मध्ये पालिकेने हे धोरण आणले होते. मात्र भाजपा, मनसेने विरोध केल्यामुळे या प्रस्तावाला सुधार समिती व पालिका सभागृहाची मंजुरी मिळाली नव्हती. त्यामुळे गेल्या तीन वर्षांपासून हा प्रस्ताव रखडला होता. आॅक्टोबर महिन्यात आदित्य ठाकरे यांनी महापालिकेत येऊन आयुक्तांची भेट घेतली होती. त्यानंतर आयुक्तांनी स्वत:च्या अधिकारात प्रशासकीय मंजुरी देऊन गच्चीवर रेस्टॉरंटच्या अंमलबजावणीचे आदेशही दिले. मात्र महासभेचा अधिकार डावलून आयुक्तांनी परस्पर हा निर्णय घेतल्याने विरोधी पक्ष संतापले होते. मनोरंजन व खेळाचे मैदान देखभालीसाठी देण्याचे धोरणही महासभेत विरोधकांना न जुमानता मंजूर करण्यात आले.काँग्रेस, राष्ट्रवादी, समाजवादी या विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन शिवसेनेला शह देण्याची रणनीती आखली आहे. गच्चीवर रेस्टॉरंट या प्रस्तावाच्या रूपाने ही संधी विरोधकांकडे चालून आली आहे. मात्र या प्रस्तावाला समाजवादी पक्षाचे समर्थन आहे. त्यामुळे महासभेत सत्ताधाºयांनंतर मोठा पक्ष असलेल्या भाजपाला गळाला लावण्याचे काँग्रेसचे प्रयत्न सुरू आहेत. शत्रूचा शत्रू हा आपला मित्र या उक्तीप्रमाणे विरोधकांनी भाजपावर विसंबून हा प्रस्ताव महासभेत नामंजूर करण्याची तयारी केली असल्याचे सूत्रांकडून समजते.

टॅग्स :मुंबई