Join us

मुंबई-अहमदाबाद महामार्गावर भीषण अपघात, तिघांचा मृत्यू तर दोघे गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: September 06, 2023 1:22 PM

या अपघातातील सर्व मृत आणि जखमी राजस्थान राज्यातील आहेत.

- मंगेश कराळे

नालासोपारा : मुंबई-अहमदाबाद महामार्गावर बुधवारी पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास सातीवली ब्रीजवर बजरंग ढाब्यासमोर भीषण अपघात घडला आहे. गुजरातच्या दिशेने भरधाव वेगाने जाणाऱ्या वाहनचालकाचे नियंत्रण सुटून गाडी दुभाजक क्रॉस करून पलिकडील मार्गिकेवर गेली होती. त्यावेळी समोरून येणार्‍या ट्रकने कारला धडक दिली. या अपघातात कारचालकासह तिघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना संस्कृती रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आले आहे. या अपघातातील सर्व मृत आणि जखमी राजस्थान राज्यातील आहेत.

बुधवारी पहाटे मारूती स्विफ्ट कार (एच आर २० ए जी ०२२६) मुंबईहून गुजरातच्या दिशेने जात होती. या गाडीत अशोक सिंघानिया, सुभाष शोत्रा, बनवारीलाल जेधीया, किसन आणि अन्य एक असे पाच जण प्रवास करत होते. पहाटे ६ वाजण्याच्या सुमारास गाडी सातिवली ब्रीजवरून बजरंग ढाब्यासमोरून जात असतान गाडीने दुभाजकाला धडक दिली. गाडीचा वेग एवढा होता की गाडी दुभाजक क्रॉस करून मुंबईच्या मार्गिगेवर आली. त्यावेळी सिल्वासा येथून एक ट्रक (एमएच ४८ बीएम ५९८९) येत होता. या ट्रकने गाडीला धडक दिली. या अपघातात स्विफ्ट कारचा चालक जागीच ठार झाला तर अन्य तिघे जखमी झाले. 

अपघाताची माहिती महामार्ग पोलिसांना मिळाल्यावर घटनास्थळी जाऊन रुग्णवाहिकेने जखमीपैकी तिघांना संस्कृती रुग्णालयात तर दोघांना गॅलेक्सी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. उपचारादरम्यान जखमींपैकी दोघांचा मृत्यू झाला. महामार्ग पोलिसांनी अपघातानंतर महामार्गावर झालेली वाहतूक कोंडी काढण्यासाठी अपघात ग्रस्त वाहने रोडच्या बाजूला घेऊन वाहतूक सुरळीत केल्याची माहिती महामार्गाचे पोलीस उपनिरीक्षक विठ्ठल चिंतामण यांनी लोकमतला दिली. वालीव पोलिसांनी याप्रकरणी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला असून ट्रकचालक प्रदीप गौडला ताब्यात घेतले आहे.

टॅग्स :अपघात