हार्बर मार्गावरील प्रवाशांची घोर निराशा!
By admin | Published: February 27, 2015 01:35 AM2015-02-27T01:35:30+5:302015-02-27T01:35:30+5:30
रेल्वे अर्थसंकल्पाने हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची पूर्णपणे निराशा केली आहे. १२ डब्यांच्या लोकलचा प्रश्न, ऐरोली व कळवा लिंक रोड
नवी मुंबई : रेल्वे अर्थसंकल्पाने हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची पूर्णपणे निराशा केली आहे. १२ डब्यांच्या लोकलचा प्रश्न, ऐरोली व कळवा लिंक रोड व इतर कामांविषयी ठोस उपाययोजना केलेल्या नसल्यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
मुंबई, ठाणे व रायगड जिल्ह्णात सर्वाधिक विकास नवी मुंबई, पनवेल व उरण परिसरात होत आहे. या परिसरात हजारो इमारती प्रत्येक वर्षी बांधल्या जात आहेत. लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. औद्योगिक पट्ट्यामुळे लाखो कामकार कामानिमित्त रोज या परिसरात येत आहेत. यामुळे हार्बर व ट्रान्स हार्बर मार्गावरील प्रवाशांची संख्या वाढत असून गर्दीमुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. हार्बर मार्गावर १९९६ पूर्वी तयार केलेल्या जुनाट लोकल चालविल्या जात आहेत. ९ डब्यांऐवजी १२ डब्यांच्या ट्रेन सुरू करण्याची मागणी अनेक वर्षांपासून सुरू आहे. परंतु हा प्रश्न अद्याप मार्गी लागलेला नाही. कल्याण ते डोंबिवली ते कसारापर्यंतच्या प्रवाशांना नवी मुंबईत येण्यासाठी ठाण्यामध्ये जावे लागते. तेथून ट्रेन बदलावी लागते. यासाठी ऐरोली ते कळवा लिंक रोड प्रस्तावित आहे. यासाठीही ठोस उपाययोजना केलेल्या नाहीत.
नवी मुंबईमधील दिघा व बोनकोडे स्थानकांविषयी निधीचा प्रश्न मार्गी लागलेला नाही. ज्यामुळे या भागाचा विकास होण्यासाठी वर्षभर थांबावे लागेल. सीवूड, उरण मार्ग, पनवेल ते कर्जत खोपोली मार्ग, पनवेल रोहा दुहेरी मार्ग यापैकी कोणत्याच कामासाठी निधीची ठोस निधीची तरतूद केलेली नाही. यामुळे प्रवाशांनी नाराजी व्यक्त केली. (प्रतिनिधी)