बांधकाम मजुरांच्या वसाहतीला भीषण आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:08 AM2021-02-23T04:08:36+5:302021-02-23T04:08:36+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क डोंबिवली : पूर्वेतील उसरघर परिसरातील एका नामांकित गृह संकुलाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या बांधकाम मजुरांच्या वसाहतीला भीषण ...

Terrible fire at construction workers' colony | बांधकाम मजुरांच्या वसाहतीला भीषण आग

बांधकाम मजुरांच्या वसाहतीला भीषण आग

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क

डोंबिवली : पूर्वेतील उसरघर परिसरातील एका नामांकित गृह संकुलाच्या प्रकल्पाच्या ठिकाणी असलेल्या बांधकाम मजुरांच्या वसाहतीला भीषण आग लागल्याची घटना रविवारी सकाळी ६ वाजण्याच्या सुमारास घडली. या ठिकाणी १७२ मजूर वास्तव्याला होते. आग लागताच सर्वांनी घराबाहेर पलायन केल्याने मोठी जीवितहानी टळली. या आगीत एका मजुराला आपला जीव गमवावा लागला असून अन्य एक जण गंभीर जखमी झाला आहे. या घटनेची नोंद स्थानिक मानपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

संबंधित गृह संकुलाचा मोठा प्रकल्प उभा राहत असून तेथे बांधकामासाठी लागणाऱ्या मजुरांना राहण्यासाठी बाजूलाच एक वसाहत निर्माण केली आहे. पत्र्याच्या स्वरूपातील तळमजला अधिक पहिला मजला अशी तात्पुरत्या स्वरूपातील १२० खोल्या तेथे बांधल्या आहेत. या ठिकाणी १७२ मजूर वास्तव्याला होते अशी माहिती मिळत आहे. ज्यावेळेस आग लागली त्यावेळेस बांधकाम प्रकल्पाच्या ठिकाणी तैनात असलेल्या सुरक्षारक्षकांनी घटनास्थळी धाव घेत मजुरांना सावध करून सुरक्षित स्थळी हलविले. आगीत तपन महालदार (२५) या मजुराचा होरपळून मृत्यू झाला, तर सुरेशकुमार हा ३५ वर्षीय मजूर गंभीर जखमी झाला आहे. जखमी सुरेशकुमारला तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. त्याची प्रकृती चिंताजनक आहे.

साडेतीन तासांनी आगीवर नियंत्रण

आगीच्या घटनेची माहिती डोंबिवली अग्निशमन विभागाला सकाळी ७ वाजता देण्यात आली. माहिती मिळताच तातडीने अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले. आगीचे रौद्र रूप पाहता पाण्याचे टँकरही मागवण्यात आले. अखेर साडेतीन तासांनी आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आल्याची माहिती अग्निशमन विभागाचे डोंबिवली केंद्रप्रमुख दत्तात्रय शेळके यांनी दिली. आग कशामुळे लागली याचे नेमके कारण समजू शकलेले नाही. शॉर्टसर्किट अथवा घरातील गॅस शेगडीचा स्फोट होऊन आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज आहे.

Web Title: Terrible fire at construction workers' colony

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.