नालासोपारा (मंगेश कराळे) - विरारमध्ये एका महिला शिक्षिकेच्या घराबाहेर रात्रीच्या सुमारास आरोपींकडून स्फोटके फोडून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याबाबत अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
विरारच्या सत्पाळा- राजोडी चार रस्ता येथे राहणाऱ्या जेनेट बावतीस लोपीस (५०) या शिक्षिकेच्या ग्रीन पार्क या घरी शुक्रवारी पहाटे चारच्या सुमारास त्या त्यांची मुलगी व वृद्ध आईसोबत घरात झोपले असताना आरोपीकडून त्यांच्या घराच्या गेटवर तीन वेळा थोड्या थोड्या वेळाच्या अंतराने स्फोटके फोडल्यामुळे परिसर दणाणून गेला होता. सदर घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.
या घटनेनंतर जेनेट लोपीस यांचे कुटुंबीय भयभीत झाली असून मानसिक तणावत आहे. तीन दुचाकी व एका सायकलवरून आलेल्या दहा जणांच्या टोळक्याकडून हा फटाक्यांचा स्फोट घडविण्यात आल्याचा अंदाज त्यांनी व्यक्त केला असून शनिवारी अर्नाळा सागरी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून एका आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक मोहन सोनवणे अधिक तपास करीत आहेत.