मुंबई : कोरोनाच्या दहशतीमुळे अन्य आजारांवरील रुग्णांवर उपचार करताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून पीपीई किटचा वापर केला जात आहे. मात्र, हे किट आजही वैद्यकीय विम्याच्या कक्षेबाहेरच आहेत. त्यामुळे त्या खर्चाचा परतावा मिळत नाही. त्यामुळे कोरोनाची लागण झालेली नसली तरी पीपीई किटचा खर्च रुग्णांचा खिसा कापत असल्याची माहिती हाती आली आहे.
मुलुंडच्या एका खासगी रुग्णालयात एक महिला गर्भासंदर्भातील आजारावर उपचारांसाठी दाखल झाली होती. शस्त्रक्रिया यशस्वी झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. कॅशलेस पॉलिसी असल्यामुळे त्यांना सुरुवातीला पैसे भरावे लागले नाहीत. मात्र, रुग्णालयाच्या १ लाख ७४ हजार रुपयांच्या बिलापैकी १ लाख ३८ हजार रुपयेच कंपनीने मंजूर केले. त्यामुळे उर्वरित ३६ हजार रुपये त्यांना भरावे लागले. त्यापैकी १९ हजार रुपये हे पीपीई किट, एन-९५ मास्क, सॅनिटायझर्स आदींचे होते. या खर्चाचा परतावा मिळावा म्हणून रुग्णालयाने तो फार्मसीच्या बिलामध्ये समाविष्ट केला होता. मात्र, विमा कंपनीने तो कन्झ्युमेबल चार्ज असल्याचेस्पष्ट करत परतावा दिला नसल्याची माहिती या महिलेच्या विमा प्रतिनिधीने दिली.कोरोनाची लागण नसलेल्या अनेक रुग्णांना असा भुर्दंड सोसावा लागत आहे. तसेच, कोरोना रुग्णांनाही पीपीई किटच्या खर्चाचा परतावा मिळत नाही.सकारात्मक प्रतिसादाची प्रतीक्षारुग्णांवरील उपचारांसाठी वैद्यकीय कर्मचाऱ्यांकडून वापरले जाणारे पीपीई किट हेसुद्धा मास्क आणि ग्लोव्हज्च्या श्रेणीत मोडत असल्याने ही कोंडी निर्माण झाली आहे. त्यामुळे हे किट कन्झ्युमेबलमध्ये समाविष्ट करू नये, अशी विनंती कंपन्यांना करण्यात आलेली आहे. मात्र, अद्याप त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याचे या प्रतिनिधींनी सांगितले.