टेरर क्राइम ब्रँच
By admin | Published: February 18, 2015 12:51 AM2015-02-18T00:51:56+5:302015-02-18T00:51:56+5:30
रवी पुजारी टोळीने निर्माते करीम मोरानी यांच्या घराबाहेर केलेला किरकोळ गोळीबार वगळता २०१४ मध्ये अंडरवर्ल्डने आखलेला प्रत्येक कट मुंबई गुन्हे शाखेने उधळून लावला.
रवी पुजारी टोळीने निर्माते करीम मोरानी यांच्या घराबाहेर केलेला किरकोळ गोळीबार वगळता २०१४ मध्ये अंडरवर्ल्डने आखलेला प्रत्येक कट मुंबई गुन्हे शाखेने उधळून लावला. आघाडीच्या इंग्रजी दैनिकाचा वार्ताहर, बॉलीवूडमधला प्रथितयश निर्माता-दिग्दर्शक आणि एका गँगस्टर्ससह आणखी काहींच्या सुपाऱ्या अंडरवर्ल्डने उचलल्या होत्या. मात्र प्रत्यक्ष गुन्हा घडण्याआधीच गुन्हे शाखेने सुपारी उचलणाऱ्यांच्या मुसक्या आवळत अनेकांना जीवनदान दिले.
१९८०-९०च्या दशकात मुंबईत अंडरवर्ल्डमधल्या विविध टोळ्यांची मजबूत पकड होती. पर्यायाने गँगवॉरही होते. त्या काळात अंडरवर्ल्ड मोडून काढण्याची महत्त्वाची कामगिरी मुुंबई गुन्हे शाखेने पार पाडली. एन्काउंटरचे नामी हत्यार उपसून गुन्हे शाखेने भल्याभल्यांना घाम फोडला होता. त्या काळातही दोन टोळ्यांना आपापसात भिडू दे, आपले काम कमी होईल, या मानसिकतेने गुन्हे शाखेने काम केले होते. त्याच काळात एन्काउंटर होऊ नये म्हणून गुन्हा केल्यानंतर पद्धतशीरपणे गुन्हे शाखेतल्या विशिष्ट युनिटकडे सरेंडर होण्याची प्रथा सुरू झाली. आजही ही प्रथा कमीअधिक प्रमाणात दिसून येते.
मात्र गेल्या वर्षी झालेल्या कारवायांमधून गुन्हे शाखेने ही मानसिकता आणि प्रथाही मोडून काढल्याचे संकेत मिळतात. छोटा राजन टोळीचा गँगस्टर रवी मल्लेश वोरा ऊर्फ डी.के. रावच्या हत्येचा कट उधळून लावत टार्गेट कोणीही असो, गुन्हे शाखेने आपले कर्तव्य चोख पार पाडले. या काळात अंडरवर्ल्डकडून होऊ घातलेले आठेक गुन्हे होण्याआधीच उधळून लावले गेले.
याच पुजारीने दिग्दर्शक करीम मोरानी यांच्या घरावर गोळीबार घडविला. त्यानंतर त्याने निर्माते-दिग्दर्शक महेश भट्ट यांची किंवा भट्ट कुटुंबीयांपैकी कोणाचीही हत्या घडवा, असे आदेश आपल्या टोळीला दिले होते. एकदम प्युअर शॉट देना, असा मेसेज त्याने आपल्या खास हस्तकाला दिला होता. पुजारी टोळी अत्यंत पद्धतशीरपणे भट्ट यांची माहिती काढत होती. भट्ट राहतात त्या इमारतीत पुजारी टोळीचा गँगस्टर वॉचमन म्हणून कामाला लागला होता. दोनेक दिवसांत भट्ट यांना शॉट देण्याचे निश्चितही झाले, पण त्याआधीच ११ जणांची पुजारी टोळी गजाआड झाली. गुन्हे शाखेच्या गुन्हेगारी गुप्तवार्ता आणि मोटारवाहन चोरीविरोधी पथकाने ही कारवाई केली. अटक केलेल्यांपैकीच काहींनी मोरानींच्या घरावर गोळ्या झाडल्याचे चौकशीत स्पष्ट झाले.
शहरात घडलेल्या प्रत्येक गंभीर गुन्ह्याचा समांतर तपास गुन्हे शाखेने केला. त्यातील अनेक गुन्ह्यांची उकलही केली. प्रीती राठी अॅसिड अटॅक आणि इस्थेर अनुह्याचे निर्घृण हत्याकांड या दोन्ही अत्यंत गुंतागुंतीच्या, देशभर चर्चा झालेल्या गुन्ह्यांचा गुन्हे शाखेने शिताफीने तपास केला आणि आरोपीही गजाआड केले. वर्षभरातील अशा कामगिरीने क्राइम ब्रांचची प्रतिमा उजळली आहे.
राजन टोळीतून फुटल्यानंतर स्वत:ची टोळी उभारण्याच्या धडपडीत असलेला व देशभक्त म्हणवून घेत दहशत निर्माण करणाऱ्या गँगस्टर रवी पुजारीने आघाडीच्या इंग्रजी दैनिकातील एका वार्ताहराच्या हत्येचा कट आखला होता. टार्गेट टप्प्यात येणार, याची वाट पाहत पुजारीचे शूटर्स दैनिकाच्या कार्यालयाजवळ पोहोचलेही होते. हे शूटर्स गोळीबार करण्याआधीच गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने त्यांना बेड्या ठोकल्या आणि त्या वार्ताहराचे प्राण वाचविले.
मावळचे भाजपा आमदार बाळा भेगाडे यांचे मामा लहू शेलार यांचाही जीव गुन्हे शाखेने वाचविला. शेलार यांच्या हत्येची सुपारी एका काँग्रेस कार्यकर्त्याने कुख्यात छोटा शकीलच्या हस्तकांना दिली होती. ही कुणकुण लागताच गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी तत्काळ पुणे गाठून शेलार यांच्यावरील संभाव्य हल्ला उधळून लावला होता.
आकडेवारी
गुन्हेउकलअटक आरोपीमालमत्ता
हत्या३८६३७०३५०००
हत्येचा प्रयत्न२५३८१७९०००
दरोडा७२१५७८६३७१८
दरोड्याची तयारी३१३१२००००
जबरी चोरी६४१०४१४३०३९०
खंडणी२४३७४०००
घरफोडी८९८९१४३७२४४८
वाहनचोरी३१२९२५१५०००
चोरी८७८५१२७२६३७२
बलात्कार९१०--
एकूण५७७७८८१०,९४,९०,८७२
जयेश शिरसाट, मुंबई