भिवंडीत ‘टेरर मॉड्यूल’ उद्ध्वस्त, आयसिसप्रकरणी महाराष्ट्र, कर्नाटकात एनआयएचे ४४ ठिकाणी छापे
By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2023 05:23 AM2023-12-10T05:23:22+5:302023-12-10T05:24:39+5:30
एनआयएने शनिवारी पहाटे चारपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत ४४ ठिकाणी छापे टाकून १५ जणांना अटक केली.
मनोज गडनीस/नितीन पंडित
मुंबई/भिवंडी : आयसिस आणि अल कायदा या दहशतवादी संघटनांचे जाळे देशभरात वाढवून त्याद्वारे दहशतवादी कृत्ये करण्याच्या तयारीत असलेल्या टोळीचे मनसुबे राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) शनिवारी उद्ध्वस्त केले. एनआयएने शनिवारी पहाटे चारपासून महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन्ही राज्यांत ४४ ठिकाणी छापे टाकून १५ जणांना अटक केली. त्यात मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी साकिब नाचन याचाही समावेश आहे.
आयसिसमध्ये सक्रिय असलेल्या संशयितांना राज्य व देशात विविध ठिकाणांहून ताब्यात घेतल्यानंतर एनआयएने भिवंडीत ठिकठिकाणी छापेमारी केली. पडघा-बोरिवली व भिवंडीतील तीनबत्ती, शांतीनगर व इस्लामपूर या परिसरात एनआयएने महाराष्ट्र एटीएसच्या मदतीने शुक्रवारी मध्यरात्रीपासून शनिवारी पहाटेपर्यंत छापे टाकले. छापेमारीत तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर रोख रक्कम, शस्त्रास्त्र, धारधार शस्त्रे, स्मार्टफोन्स, डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त केली. अटक केलेल्या सर्व आरोपींना दिल्लीला नेण्यात आले आहे.
अटक करण्यात आलेल्यांची नावे
साकिब नाचन, हासिब मुल्ला, मुसाब मुल्ला, रेहान सुसे, फरहान सुसे, फिरोझ कुवार, आदिल खोत, मुखलिस नाचन, सैफ आतिक नाचन, याह्या खोत, राफिल नाचन, राझील नाचन, शकुब दिवकर, कासीफ बेलारे, मुन्झीर केपी.
कुठे किती छापे?
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोलिसांसमवेत पुण्यात दोन, ठाण्यात नऊ ठिकाणी, ठाणे ग्रामीणमध्ये कल्याण, भिवंडी, पडघा, बोरिवली येथे ३१ ठिकाणी, तर भाईंदर येथे एका ठिकाणी छापेमारी केली. कर्नाटकातही एका ठिकाणी छापेमारी झाली आहे.
मुंबईतल्या डेटा सायन्टिस्टवर बंगळुरूत कारवाई
राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी बंगळुरूतही छापेमारी केली. अली अब्बासच्या घरी ही छापेमारी करण्यात आली असून तो मुंबईत वास्तव्यास होता. त्याने डेटा सायन्सचे उच्चशिक्षण घेतले असून बंगळुरू येथे तो ऊर्दू माध्यमाची शाळा चालवत असल्याचे समजते.
२०१८ मध्ये तो मुंबई सोडून बंगळुरू येथे राहण्यास गेला. आयसिसशी त्याचा संपर्क असल्याच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली. त्याच्या घरातून १६ लाख रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे.
मुंबई विमानतळावरही घातली धाड?
या छापेमारीदरम्यान मुंबई विमानतळाच्या कार्गो विभागातही एनआयएच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याचे समजते. तिथल्या काही लोकांची या अधिकाऱ्यांनी कसून चौकशी केल्याची माहिती आहे.
पुण्यात एनआयएच्या कारवाईत इलेक्ट्रॉनिक दस्तावेज जप्त
पुणे : राष्ट्रीय सुरक्षा एजन्सीने (एनआयए) कोंढव्यात दोन ठिकाणी छापे घातले. शोएब अली शेख (रा. इसेन्सिया साेसायटी, काेंढवा) आणि अन्वर अली जावेद अली खान (रा. सत्यानंद हाॅस्पिटलच्या पाठीमागे, काेंढवा) या दाेघांची चाैकशी करून, त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक दस्तावेज जप्त करण्यात आला.
शाेएब आणि अन्वर दाेघेही कोंढव्यात भाड्याने जागा घेऊन राहात होते. एनआयएने त्यांच्या घराची झाडाझडती घेतली. परिसरात मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला होता. शोएब अली शेख हा हडपसरच्या एका कंपनीत नोकरीला आहे.
तो मूळचा कल्याण कोळसेवाडी येथील असून, कोंढव्यात वास्तव्यास आहे. अन्वर अली जावेद अली खान हाही कोंढव्यातच राहिला आहे. एनआयएच्या पथकाने त्यांची चौकशी केली असून, त्यांच्याकडील इलेक्ट्रॉनिक दस्तावेज जप्त करण्यात आले असल्याचे पोलिसांनी सांगितले.