'हा' तर ठाकरे सरकारचा आतंकवाद, सुधीर मुनगंटीवारांनी डागली तोफ
By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2021 11:38 PM2021-12-28T23:38:48+5:302021-12-28T23:47:55+5:30
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, लोकशाही दहशतवादात नेण्याचं काम सरकारने केलंय.
मुंबई - राज्यातील विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचं सूप आज वाजलं. सरकारने जाहीर केल्याप्रमाणे 22 ते 28 डिसेंबरपर्यंतच हे अधिवेशन चाललं. अधिवेशन कालावधी वाढविण्याची मागणी विरोधी पक्षांकडून होत होती. मात्र, सरकारने 5 दिवसांतच अधिवेशन गुंडाळलं. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप आणि गदारोळात अनेक विधेयकं या अधिवेशनात मंजूर करण्यात आली आहेत. मात्र, शेवटच्या दिवशी उशिरा विद्यीपीठ विधेयक चर्चा न करता मंजूर करण्यात आल्याने विरोधी पक्षातील नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी माध्यमांशी संवाद साधताना राज्य सरकारवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच, लोकशाही दहशतवादात नेण्याचं काम सरकारने केलंय. हा तर सरकारचा आतंकवाद आहे, असे म्हणत विद्यापीठ विधेयकावरुन सरकारवर तोफ डागलीय
महाराष्ट्राची शैक्षणिक प्रगती व्हावी, यासाठी देवेंद्र फडणवीस सूचना मांडत होते. मात्र, त्याचवेळी बेईमानी करत सरकारने लोकशाहीच्या सर्व प्रथा परंपरेचं उल्लंघन करत विद्यापीठ विधेयक मंजूर केलं आहे. ज्या कायद्याच्या माध्यमातून सरकारला कुटुंबातील ढ विद्यार्थ्यालाही मेरीटची मार्कलिस्ट द्यायचीय, असे म्हणत सुधीर मुनगंटीवार यांनीही विद्यीपाठ विधेयकावरुन महाविकास आघाडी सरकावर हल्लाबोल केला.
As the #WinterSession2021 ends, interacting with media at Vidhan Bhavan.#Maharashtra#MaharashtraAssemblyhttps://t.co/srijIJbucC
— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) December 28, 2021
शाहू महाराजांचं हे राज्य आहे, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचं राज्य आहे, क्रांतीज्योती सावित्रीमाई फुले, क्रांतीसूर्य महात्मा फुलेंचं हे राज्य असून शिक्षण क्षेत्रात अव्यवस्था करण्याचं पाप सरकारकडून होत आहे. त्यामुळेच, आता या सरकारविरोधात राज्यातील तरुणांना आवाहन करत चांद्यापासून बांद्यापर्यंत आणि गडचिरोलीपासून ते गडहिंग्लजपर्यंत तरुणाईला जागवणार असल्याचं मुनगंटीवार यांनी म्हटलं. उच्च तंत्र शिक्षणमंत्र्यांचं नाव उदय आहे, पण शैक्षणिक विभागाचा अस्त करण्याचं काम त्यांनी केलंय, असा घणाघाती आरोपही मुनगंटीवार यांनी केला.
जानेवारी महिन्यात राज्यभर निषेध आंदोलन
विद्यीपाठ विधेयकाविरुद्ध भाजप आणि भाजपयुमोच्यावतीने जानेवारी महिन्यात राज्यातील सर्वच विद्यापीठ आणि महाविद्यालयात निषेध आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली. तसेच, या विधेयकाविरोधात आम्ही राज्यपालांना भेटणार आहोत, त्यांना याचे विपरीत परिणाम सांगणार आहोत. तसेच, गरज पडल्यास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयातही जाणार असल्याचे फडणवीस यांनी स्पष्ट केले. महारााष्ट्राच्या विधानसभा इतिहासातील सर्वात पळपुटं सरकार म्हणजे ठाकरे सरकार आहे. विद्यापीठ विधेयक म्हणजे लोकशाही हत्या असल्याचा आरोपही फडणवीस यांनी केला.