Join us

दहशतवाद नवी मुंबईच्या उंबरठ्यावर

By admin | Published: March 16, 2015 1:48 AM

शहरात घडलेल्या गंभीर घटनांवरून दहशतवाद नवी मुंबईच्या उंबरठ्यावर पोहोचला असल्याची भीती निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी व्यक्त केली

नवी मुंबई : शहरात घडलेल्या गंभीर घटनांवरून दहशतवाद नवी मुंबईच्या उंबरठ्यावर पोहोचला असल्याची भीती निवृत्त अप्पर पोलीस महासंचालक रामराव वाघ यांनी व्यक्त केली. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी नागरिक आणि पोलिसांमध्ये दुवा निर्माण होण्याची आवश्यकता त्यांनी यावेळी व्यक्त केली.गुन्हेगारांशी सामना करताना पोलीस कोणत्या प्रकारची शस्त्रे वापरतात याची माहिती नागरिकांना देण्यासाठी वाशीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या वेळी बॉम्बशोधक पथकाकडील उपकरणांसह पोलिसांकडील हत्यारांचे प्रदर्शन मांडण्यात आले. त्यामध्ये एके ४७, पिस्तूल, रायफल, अश्रुधुराचा मारा करणारे शस्त्र, हात बॉम्ब, मेटल डिटेक्टर अशी उपकरणे व शस्त्रांचा समावेश होता. नागरी सुरक्षेची पोलिसांकडील ही साधने पाहण्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती. यावेळी उपआयुक्त शहाजी उमाप, सहाय्यक आयुक्त अरुण वालतुरे, राज्य गुप्तवार्ता प्रबोधिनीचे सहाय्यक निरीक्षक मयेकर हे प्रामुख्याने उपस्थित होते. या वेळी नवी मुंबई पोलीस आयुक्तपदाच्या कार्यकाळातील आपल्या आठवणींना वाघ यांनी उजाळा दिला. गतकाळात शहरात काही गंभीर गुन्ह्यांच्या घटना घडल्या आहेत. बाबासाहेब आढाव यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष पोलीस कर्मचाऱ्याला प्राण गमवावे लागल्याचेही त्यांनी सांगितले. त्याशिवाय वाशी व पनवेल येथे यापूर्वी जिवंत बॉम्ब देखील सापडले आहेत. यावरून नवी मुंबईपर्यंत दहशतवाद पोहोचल्याचे स्पष्ट होत असल्याचे रामराव वाघ यांनी सांगितले. मात्र हा दहशतवाद मोडून काढण्यासाठी महाराष्ट्र पोलीस सक्षम असल्याचेही ते म्हणाले. याकरिता कोणत्याही शस्त्राविना कसाबला पकडणाऱ्या शहीद तुकाराम ओंबाळे यांचे उदाहरणही त्यांनी दिले.यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रामचंद्र देशमुख, राम पाठारे, संगीता अल्फांसो, मीरा बनसोडे, चंद्रसेन देशमुख आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)