ISच्या मुदब्बीर शेखच्या हट्टामुळे टळले भारतावरील दहशतवादी हल्ले
By admin | Published: March 23, 2016 09:19 AM2016-03-23T09:19:15+5:302016-03-23T11:32:00+5:30
इसिसच्या १६ दहशतवाद्यांना अटक करत राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र एटीएसने देशावरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला आहे
Next
>
डिप्पी वांकाणी
मुंबई, दि. २३ - इसिस (इस्लामिक स्टेट ऑफ इराक अॅण्ड सिरिया) या दहशतवादी संघटनेचा भारतातील दहशतवादी मुदब्बीर शेखने एकाच वेळी देशात अनेक ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखली होती. मात्र इसिसच्या इतर सदस्यांनी या योजनेला विरोध दर्शवत योग्य संधी मिळताच एकामागोमाग एक हल्ले करण्याची सूचना केली होती. मुदब्बीर शेखच्या या हट्टामुळे भारतातील अनके संभाव्य दहशतवादी हल्ले टळले आणि मोठा अनर्थ टळला.
राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) आणि महाराष्ट्र एटीएसने इसिसच्या १६ दहशतवाद्यांना अटक केली आणि देशावरील दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला. या दहशतवाद्यांच्या केलेल्या चौकशीतून अनेक महत्वपूर्ण बाबी समोर आल्या आहेत. मुंब्र्यातील आयटी इंजिनिअर असलेल्या मुदब्बीर शेखने एकाच वेळी देशात अनेक ठिकाणी हल्ले करण्याची योजना आखली होती. मात्र इसिसने या योजनेला विरोध दर्शवला होता. देशात अनेक ठिकाणी एकाच वेळी हल्ले केल्याने दहशतवादविरोधी यंत्रणा सतर्क होतील असे सांगत योग्य संधी मिळाल्यावरच हा हल्ला करावा असे इसिसने स्पष्ट केले होते.
लोकमतच्या सुत्रांना मिळालेल्या माहितीनुसार शफी अम्मार उर्फ युसुफ हाताळत असलेल्या इसिसच्या १६ ऑपरेटीव्हना अटक करण्यात आली असून त्यात मुदब्बीर शेखचादेखील समावेश आहे. लखनऊमध्ये पार पडलेल्या इसिसच्या बैठकीला मुदब्बीरने हजेरी लावली होती. या बैठकीत त्याने इसिसची एक आर्मी तयार करुन देशभरात हल्ले करण्याची योजना मांडली होती. एकाच वेळी हे हल्ले करावेत ज्यामागे काही हेतू नसावा असंही मुदब्बीरने सांगितल्याची माहिती गुप्तचर खात्यातील एका अधिका-याने दिली आहे.
माझगावमधून अटक करण्यात आलेला उद्योजक खान मोहम्मद हुसेननेदेखील या बैठकीला हजेरी लावली होती. या बैठकीत त्याने इसिसला आर्थिक मदत देण्याची शपथ घेतली होती. तसंच दहशतवाद्यांना राहण्यासाठी घर देण्याचं आश्वासनदेखील दिलं होतं मात्र या ऑपरेशनमध्ये सहभागी होण्यास नकार दर्शवला. शफी अम्मार उर्फ युसुफने हुसेनला 1.5 किलो स्फोटक पाठवली होती. चौकशीत स्फोटक मिळाल्याची कबुली मोहम्मद हुसेनने दिली आहे. मात्र ही स्फोटक आपण शौचालयात टाकून दिल्याचं तो सांगत आहे ज्यावर विश्वास ठेवणं कठीण आहे. हे प्रकरण महाराष्ट्र एटीएसकडून एनआयएकडे सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे हुसेनने दिलेल्या माहितीवरुन ते तपास करुन निर्णय घेतील अशी माहिती अधिका-याने दिली आहे.
तरुणांना सोशल मिडियाच्या आधारे भरती करण्याची जबाबदारी उत्तरप्रदेशच्या 21 वर्षीय रिझवान शेखवर देण्यात आली होती. महाराष्ट्र एटीएसने त्यालाही अटक केली आहे. सुरुवातील फेसबुकवरुन चॅटींग करत व्हॉट्सअॅप ग्रुप तयार केला जायचा. आणि त्यानंतर नवीन अॅप्लिकेशन्स वापरले जायचे. रिझवान तरुण असल्याने त्याच्यावर तरुणांना भरती करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती.
मुख्य दहशतवादी अद्याप फरारच
दरम्यान या १६ दहशतवाद्यांना अटक करण्यात आली असली तरीही इसिसचा एक मोस्ट वाँटेड दहशतवादी अद्यापही फरार आहे. आत्तापर्यं आम्हाला इसिसचा केवळ एक गट उध्वस्त करण्यात यश मिळाले आहे, मात्र इसिसचा हा प्रमुख दहशतवादी देशातील अशा अनेक दहशतवादी गटांशी संपर्कात असून त्याला पकडणे हे आमचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे एका अधिका-याने सांगितले.