राणाला बिर्याणी नको, थेट फाशीच द्या! लोकांचे प्राण वाचवणाऱ्या चहाविक्रेत्यासह अनेकांची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:34 IST2025-04-11T12:34:05+5:302025-04-11T12:34:34+5:30
२००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यात अनेक लोकांचे प्राण वाचविणाऱ्या मोहम्मद तौफिक या चहाविक्रेत्यासह अनेकांची मागणी; १६६ जणांचे नाहक बळी घेणाऱ्याला भर चौकात लटकविण्याची मागणी; भारत सरकारच्या १५ वर्षांच्या अथक प्रयत्नांना, मुत्सद्देगिरीला अखेर आले यश; अटकेमुळे भारतीयांना आनंद तर पाकिस्तानला मोठा झटका

राणाला बिर्याणी नको, थेट फाशीच द्या! लोकांचे प्राण वाचवणाऱ्या चहाविक्रेत्यासह अनेकांची मागणी
लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : २००८ मधील मुंबई दहशतवादी हल्ल्यातील मुख्य आरोपी तहव्वूर राणाला कोणतीही खास वागणूक म्हणजे बिर्याणी, वेगळी कोठडी अशा काहीही सुविधा देऊ नका, अशी मागणी या हल्ल्याच्या वेळी अनेक लोकांचे प्राण वाचविणाऱ्या मोहम्मद तौफिक या चहाविक्रेत्याने केली आहे. राणाला फाशी द्या, अशी मागणी त्यांनी केली.
छोटू चहावाला या नावानेही ओळखल्या जाणाऱ्या मोहम्मद हे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या (सीएमएसटी) नजीक चहाविक्रीचा व्यवसाय करतात. मुंबईवर झालेल्या हल्ल्यात दहशतवाद्यांनी शेकडो लोकांना गोळ्या घालून ठार मारल्याचे मोहम्मद यांनी प्रत्यक्ष पाहिले होते. सीएमएसटीमध्ये गोळीबार सुरू असताना त्यांनी अनेक प्रवाशांना सतर्क केले. त्यांना दुसऱ्या सुरक्षित मार्गाने टर्मिनसपासून दूर निघून जाण्यास मार्गदर्शन केले. अनेक जखमींना रुग्णालयात पोहोचवले, असे मानवतावादी कार्य करणाऱ्या मोहम्मद तौफिक यांनी म्हटले आहे की, अजमल कसाबला मिळाली होती तशी वेगळी कोठडी, बिर्याणी व इतर सुविधा तहव्वूर राणाला देण्याची गरज नाही.
राणाचे प्रत्यार्पण केल्यानंतर तौफिक यांनी अमेरिकी सरकार व राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले. मोहम्मद म्हणाले की, भारतानेही दहशतवाद्यांसाठी कठोर कायदे तयार करावेत. राणाला भारतात आणल्यानंतर १५ दिवसांत किंवा दोन-तीन महिन्यांत सार्वजनिकरीत्या फाशी देण्यात यावी, अशा गुन्हेगारांना कसाबसारखी कोणतीही खास वागणूक देण्याची आणि कोट्यवधी रुपये खर्च करण्याची गरज नाही. राणाला फाशीची शिक्षा झाल्यावर मी तो क्षण साजरा करणार आहे.
‘राणाला फाशीची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता’
मुंबई हल्ल्याबाबत सुरू असलेल्या खटल्यात तहव्वूर राणा याला निश्चितच दोषी ठरविले जाईल. कदाचित त्याला फाशीची शिक्षा सुनावली जाण्याची शक्यता आहे, असे केंद्रीय गृह खात्याचे माजी सचिव गोपालकृष्ण पिल्लई यांनी गुरुवारी सांगितले. ते म्हणाले की, राणा हा डेव्हिड कोलमन हेडलीचा सहकारी आहे. राणाने मुंबईत आपल्या कंपनीचे इमिग्रेशन कार्यालय सुरू केले. त्याने तिथे डेव्हिडला नोकरी दिली. त्याला भारतात येण्यासाठी व्हिसा मिळावा, यासाठी ही सोय करण्यात आली. राणाच्या भारतातील चौकशीत अनेक गोष्टी स्पष्ट होतील, असे पिल्लई म्हणाले.
‘ती’ अफवा वकील उज्ज्वल निकम यांनीच पसरविली
विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी २०१५ मध्ये स्पष्ट केले होते की, कसाबने तुरुंगात मटण बिर्याणी मागितल्याची गोष्ट फक्त एक अफवा होती. कसाबबद्दल जनतेमध्ये निर्माण होत असलेली सहानुभूतीची लाट रोखण्यासाठी ही अफवा पसरविण्यात आली. कसाबने कधीच बिर्याणी मागितली नाही आणि सरकारकडून त्याला ती देण्यात आली नाही. मी ही गोष्ट जाणीवपूर्वक पसरवली. कारण, खटल्यादरम्यान कसाबबद्दल काही जणांच्या मनात सहानुभूती निर्माण झाली होती, असे निकम यांनी सांगितले.
हल्ल्यातील पीडितांना
न्याय मिळेल : अमेरिका
राणा याचे प्रत्यार्पण हे या क्रूर हल्ल्यातील पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल असल्याचे अमेरिकेने गुरुवारी म्हटले आहे. अमेरिकेने बुधवारी पाकिस्तानी वंशाचा आणि कॅनेडियन नागरिक असलेल्या राणाला भारताकडे प्रत्यार्पित केले, असे न्याय विभागाच्या प्रवक्त्याने सांगितले. अमेरिकन न्याय विभागाच्या प्रवक्त्याने म्हटले आहे की, राणाचे प्रत्यार्पण हे सहा अमेरिकन आणि हल्ल्यात मारल्या गेलेल्या इतर अनेक पीडितांना न्याय मिळवून देण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल आहे.