Join us

अतिरेकी मुंबईत करणार होते ‘गॅस अटॅक’?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 4:06 AM

मुंबई : दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या संशयित अतिरेक्यांचा मुंबईत गर्दीच्या ठिकाणी विषारी वायूद्वारे (गॅस अटॅक) घातपात करण्याचा कट होता. ...

मुंबई : दिल्ली पोलिसांनी पकडलेल्या संशयित अतिरेक्यांचा मुंबईत गर्दीच्या ठिकाणी विषारी वायूद्वारे (गॅस अटॅक) घातपात करण्याचा कट होता. त्यासाठी महत्त्वाची रेल्वे स्टेशन्स व गजबजलेल्या गर्दीच्या ठिकाणाची रेकी करण्यात येणार होती, असे सांगण्यात आले.

सहा अतिरेक्यांशी संबंधित असल्याच्या संशयाने मुंबई एटीएसच्या पथकाने झाकीर शेखला शुक्रवारी रात्री अटक केली. त्याला शनिवारी न्यायालयात हजर केले असता २० सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी मिळाली आहे. धारावीतील जान मोहम्मद शेखच्या समवेत तो या कटात सहभागी होता. मुंबईसह उत्तर प्रदेश व दिल्लीत हल्ला करण्यासाठी त्यांना अनिस अहमदकडून शस्त्रास्त्रे पुरविली जाणार होती, अशी माहिती तपासातून समोर आली आहे.

---------------

दिल्ली पोलीस नाराज

महाराष्ट्र एटीएसने झाकीर शेखला दिल्ली पोलिसांच्या ताब्यात न देता त्याच्यावर स्वतःहून स्वतंत्र गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे त्याला दोन दिवसांची कोठडी मिळाल्याने काही दिवस तो मुंबई एटीएसच्या ताब्यात राहील. या कारवाईमुळे दिल्ली पोलीसबरोबर त्यांचा वाद झाला असल्याचे सांगण्यात येते. वास्तविक हा कट दिल्ली पोलिसांनी उघडकीस आणला होता, तसेच झाकीरला पकडण्यासाठी मंगळवारी त्यांचे एक पथक मुंबईत आले होते. मात्र, त्यांच्या तो हाती लागला नाही. एटीएसची कोठडी संपल्यानंतर त्यांना झाकीरचा ताबा मिळू शकतो. तोपर्यंत एटीएसच्या माहितीवर अवलंबून राहावे लागणार आहे.