मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर एसटीचे कर्मचारी अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांची एसटी बसद्वारे ने-आण करत आहेत. त्यामुळे या एसटी कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्याची मागणी एसटी कर्मचारी संघटनेने केली आहे.
अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या पोलीस, रुग्णालय कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे. अत्यावश्यक सेवेत मोडणाऱ्या एसटी महामंडळातील एसटी चालक, वाहक व इतर कामगारांची कोरोना चाचणी करण्याची मागणी महाराष्ट्र एस.टी कामगार सेनेने केली आहेत. या संदर्भात सेनेने राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्याशी पत्रव्यवहार केला आहे.
कोरोनामुळे दुसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन 3 मेपर्यत वाढविण्यात आले आहे. त्यामुळे सर्व वाहतूक बंद आहे. मात्र अत्यावश्यक सेवेमध्ये काम करणाऱ्या डॉक्टर, पोलीस आणि महानगरपालिका कर्मचारी यांना ने-आण करण्यासाठी एसटी महामंडळाच्या मुंबई, ठाणे व पालघर विभागातून एसटी बस सुरु आहेत. एसटीचे कर्मचारी हि अत्यावश्यक सेवा बजावत आहे. त्यामुळे ज्याप्रमाणे पोलीस, रुग्णालय कर्मचारीकोरोना चाचणी करण्यात आली. त्याप्रमाणे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्या महामंडळातील एसटी चालक, वाहक व इतर कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात यावी, अशी मागणी महाराष्ट्र एस.टी कामगार सेनेने केली आहे.
एसटीचे चालक आणि वाहक महापालिका रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचारी, पोलीस यांच्या संपर्कात येतात. पोलीस आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांमध्ये भीतीदायक वातावरण निर्माण झाले आहेत. कर्मचाऱ्यांमधील भीती नाहीशी करण्यासाठी त्यांची कोरोना तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.