मनोहर कुंभेजकर
मुंबई : उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील आंबोली विधानसभा मतदारसंघाचे २००९ मध्ये वसोर्वा आणि अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघ असे विभाजन झाले. झोपडपट्टीवासीय, मध्यमवर्गीय, श्रीमंत तसेच सुपरस्टार अमिताभ बच्चन यांच्यासह सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांचा हा मतदारसंघ आहे. मराठी भाषिक व अल्पसंख्याक यांचे येथे मोठ्या संख्येने वास्तव्य आहे.
गेल्या पाच वर्षात भाजपाचे विद्यमान आमदार व मुंबई भाजप सरचिटणीस अमित साटम यांनी विकास कामे केली. त्यांच्या दांडग्या जनसंपकार्मुळे मतदार संघाची त्यांनी चांगली बांधणी केली आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आमदार साटम यांची थेट लढत काँग्रेसच्या माजी आमदार अशोक जाधव व मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस मोहसिन हैदर यांच्यापैकी एकाशी असेल. अल्पसंख्यांक मते ९० हजाराच्या वर असून ती निर्णायक ठरण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लोकसभा निवडणुकीत महायुतीचे खासदार गजानन कीर्तिकर यांनी काँग्रेसचे संजय निरुपम यांचा २, ६०, ३२८ मतांनी दारुण पराभव केला होता. अंधेरी पश्चिम विधानसभेचा विचार करता येथे एकूण १, ५१, १०४ इतके मतदान झाले. त्यापैकी कीर्तिकर यांना ८३, ७८८ तर निरुपम यांना ५८,३२४ इतके मतदान झाले. २०१४च्या लोकसभा निवडणुकीनंतर सहा महिन्यांनी झालेल्या विधानसभा निवडणुकीत अखेरच्या क्षणी युती तुटली. येथून भाजपाचे विद्यमान आमदार अमित साटम निवडून आले. अंधेरी पश्चिम विधासभेचा विचार करता २०१४च्या निवडणुकीत अमित साटम यांना ५९,२०० मते, तर काँग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव यांना ३४, ९८२ मते मिळाली. शिवसेनेच्या जयवंत परब यांना २४ हजार मते मळाली. साटम यांनी जाधव यांचा २४२१८ मतांनी पराभव केला.एकूण मतदार २, ९७, ८९३ आहेत. त्यात पुरुष मतदार १, ५७, २०१३ एवढे तर महिला मतदारांची संख्या १, ३९, ६८२ इतकी आहे. २०१७च्या पालिका निवडणुकीतही शिवसेना व भाजप युती तुटली होती. यावेळी येथून भाजपचे ५, कॉंग्रेसचे २ व शिवसेनेचा १ असे एकूण ८ नगरसेवक निवडून आले.दृष्टिक्षेपात राजकारणभाजपचे स्थानिक आमदार अमित साटम आणि त्यांचे नगरसेवक आणि कार्यकर्ते तसेच शिवसेनेची मजबूत फळी यामुळे या मतदारसंघात अमित साटम यांचे काँग्रेस आघाडी समोर मोठे आव्हान असेल.कॉग्रेसचे माजी आमदार अशोक जाधव व मुंबई काँग्रेसचे सरचिटणीस मोहसिन हैदर हे मतदार संघात सक्रिय राहिले आहेत. या दोघांना मानणारा मोठा मतदार येथे आहे. त्यामुळे आमदार साटम यांच्या समोर काँग्रेसचे मोठे आव्हान असणार आहे.