कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 06:53 PM2020-08-11T18:53:11+5:302020-08-11T18:53:46+5:30
गणेश भक्तांना कोकणात आपल्या गावी गणपती उत्सव साजरा करण्याचे वेध लागले आहेत.
मुंबई : गणपती उत्सव आता जवळ आला असून गणेश भक्तांना कोकणात आपल्या गावी गणपती उत्सव साजरा करण्याचे वेध लागले आहेत. कोकणात जाणाऱ्या ज्या प्रवाश्यांचे तिकीट आरक्षित झाले आहे,तो कोरोना ई पास समजण्यात येणार आहे. कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची रॅपिड अँटीजेन टेस्ट करा आणि ती निगेटिव्ह आल्यास सदर प्रवाश्यांना क्वारंटाईन करण्याची गरज नाही. तसेच जे प्रवासी दि,12 ऑगस्ट नंतर कोकणात जाणार आहे त्यांची कोरोना चाचणी न करता रॅपिड अँटीजेन टेस्ट करावी अशी मागणी उत्तर मुंबईचे भाजपा खासदार गोपाळ शेट्टी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पाठवलेल्या पत्रात व्यक्त केले आहे.जेणेकरून प्रवाश्यांना कोरोना चाचणीचा भुर्दंड पडणार नाही असे मत त्यांनी व्यक्त केले.
कोकणात लांब लांब घरे असल्याने कोकणवासीय हे एक प्रकारे सोशल डिस्टनसिंग पाळत असून कोकणात ऑक्सिजनचे प्रमाण चांगले आहे. त्यामुळे शासनाने या सकारात्मक बाबींचा विचार करून कोकणात जाणाऱ्या प्रवाश्यांना याचा त्रास होणार नाही.आपल्या मागणीचा सकारात्मक विचार करून कोकणवासीयांना दिलासा द्यावा असे मत खासदार गोपाळ शेट्टी यांनी व्यक्त केले. केंद्रीय रेल्वे मंत्री पियुष गोयल यांच्याबरोबर दि,22 जुलै रोजी झालेल्या वेबिनार मिटींग मध्ये कोकणवासीयांसाठी गणेशोत्सवात विशेष गाडी सोडण्याची मागणी आपण केली होती. जर राज्य सरकारने केंद्र सरकारकडे विशेष गाडीची मागणी केल्यास त्यास मान्यता देता येईल. आपल्या मागणीचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन दि,7 ऑगस्ट रोजी राज्य शासनाने विशेष गाडी सोडण्यास तयारी दर्शवल्याबद्धल त्यांनी मुख्यमंत्रांचे विशेष अभिनंदन केले.