मुंबई : डेल्टा प्लस विषाणूची चाचणी करण्यासाठी सध्या मुंबईतील नमुने पुणे येथे पाठवावे लागत आहेत. तिथून अहवाल येण्यासाठी दीड ते दोन महिन्यांचा कालावधी लागत आहे. त्यामुळे ही गैरसोय दूर करण्यासाठी पालिकेने चिंचपोकळीच्या कस्तुरबा रुग्णालयात डेल्टा प्लससाठीच्या चाचण्या करण्याची तयारी सुरू केली आहे. यासाठी अमेरिकेहून साडेसहा कोटींचे अत्याधुनिक मशीन दोन आठवड्यांत आणण्यात येणार आहे. त्यानंतर दोन-तीन दिवसांत डेल्टा चाचणी अहवाल मिळू शकेल.
फेब्रुवारीपासून मुंबईत कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा संसर्ग सुरू झाला. या संसर्गाचे प्रमाण आता पूर्णपणे नियंत्रणात येत असताना डेल्टा प्लसरुपी संकट मुंबईवर ओढावले आहे. कोरोनाचे बदललेले स्वरूप असलेल्या डेल्टा प्लसच्या संशयित ६०० रुग्णांचे अहवाल पालिकेला मिळाले आहेत. डेल्टाचा संसर्ग झालेला आतापर्यंत केवळ एक रुग्ण आढळला असून तो बरा झाला आहे. परंतु, खबरदारी म्हणून अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विषाणूंची चाचणी करण्यासाठी पालिकेकडून यंत्रणा उभारण्यात येत आहे.
कुठे होणार चाचण्या?डेल्टा प्लस हा कोरोनापेक्षा वेगाने पसरणारा विषाणू आहे. त्यामुळे एखाद्या ठिकाणी, वस्ती किंवा परिसरात झपाट्याने एकाच प्रकारची लक्षणे असलेले रुग्ण आढळल्यास किंवा एखादा मृत्यू संशयित विषाणूजन्य आढळल्यास त्या भागात अशा चाचण्या केल्या जाणार आहेत. एका दिवसात दोनशे ते तीनशे चाचण्या होऊ शकतील. मात्र ही चाचणी खर्चिक असल्याने सरसकट केली जाणार नाही.
निदान लवकर झाल्यास उपचार करणे साेपेडेल्टा प्लससह अशाच प्रकारच्या वेगळ्या विषाणूंच्या चाचण्या करण्यासाठी कस्तुरबा रुग्णालयात अत्याधुनिक मशीन आणली जात आहे. त्यामुळे दोन ते तीन दिवसांत अहवाल मिळू शकेल. त्यामुळे बाधित रुग्णांचे निदान लवकर झाल्यास खबरदारी आणि उपचार करणे साेपे होईल.- सुरेश काकाणी, अतिरिक्त पालिका आयुक्त