Join us

परीक्षेचे निकाल झाले जाहीर; मात्र अजूनही हातात गुणपत्रिका नाहीत

By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2021 7:12 AM

नोकरी शोधणारे एमकॉमचे विद्यार्थी हतबल

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई विद्यापीठात दरवर्षी परीक्षा आणि निकाल यांचा गोंधळ नवा राहिलेला नाही. यंदा परीक्षा ऑनलाइन घेतल्याने पेपर तपासणी आणि निकालास बराच वेळ लागला. त्यानंतर विद्यार्थ्यांना अद्याप गुणपत्रिका देण्यात आलेल्या नाहीत. त्यामुळे पुढील शिक्षणासाठी, नोकरीकरिता विद्यार्थ्यांना या गुणपत्रिका न मिळाल्याने ते हतबल झाले आहेत.

विद्यापीठाच्या एमकॉम अंतिम सत्राचा निकाल ११ नोव्हेंबर २०२० रोजी जाहीर करण्यात आला; परंतु अजूनही विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळालेल्या नाहीत. त्यामुळे गुणपत्रिकांसाठी विद्यार्थ्यांना विद्यापीठाच्या फेऱ्या मारण्याची वेळ आली आहे. गुणपत्रिकेअभावी एमकॉमच्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण आणि नोकरी मिळविण्यात अडचणी येत आहेत. गुणपत्रिका कधी मिळणार याची विचारणा विद्यार्थी आपल्या विभागाकडे करीत आहेत. परंतु विभागाकडून त्यांना उडवाउडवीची उत्तरे देण्यात येत असल्याच्या तक्रारी विद्यार्थ्यांनी केल्या आहेत. विद्यार्थ्यांना अशा प्रकारची वागणूक देणे उचित नाही आणि याची आपण दखल घेऊन विद्यार्थ्यांना तातडीने गुणपत्रिका देण्याची कार्यवाही करावी, अशी मागणी सिनेट सदस्य सुधाकर तांबोळी यांनी कुलगुरू सुहास पेडणेकर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. यासंदर्भात परीक्षा व मूल्यमापन संचालक मंडळाचे विनोद पाटील यांना संपर्क करण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही.

विद्यापीठांत अनेक निकाल जाहीर होतात. परंतु विद्यार्थ्यांना गुणपत्रिका मिळण्यात सहा महिने ते वर्षभर विद्यापीठात चकरा माराव्या लागतात हा प्रकार दरवर्षीचा असल्याचे तांबोळी यांनी म्हटले आहे. विद्यार्थ्यांचे यामध्ये शैक्षणिक नुकसान तर होतेच, पण मानसिक त्रासही सहन करावा लागतो. काही विद्यार्थ्यांना विद्यापीठ चुकीच्या गुणपत्रिका पाठवते. मुळात गुणपत्रिका छपाई करण्यापूर्वी त्या एकदा पडताळून पाहणे गरजेचे आहे, असे तांबोळी यांनी सांगितले.

विद्यार्थी केंद्रस्थानी हवाविद्यार्थ्यांपासून आलेल्या शुल्कावरच आपण अधिकारी व कर्मचारी यांचे पगार देत असतो मग विद्यार्थ्यांना आवश्यक त्या सुविधा पुरविण्यात हलगर्जीपणा प्रशासन का दाखवत आहे? विद्यापीठ प्रशासनाने विद्यार्थ्यांना केंद्रस्थानी ठेवून आवश्यक ती अंमलबजावणी तातडीने करावी हीच मागणी आहे?- सुधाकर तांबोळी, सिनेट सदस्य, मुंबई विद्यापीठ

टॅग्स :महाविद्यालयपरीक्षा