Join us

चाचणीचा मुहूर्त पुन्हा टळला

By admin | Published: September 14, 2016 6:02 AM

एसी लोकलची चाचणी करण्यासाठी मध्य रेल्वेला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. ही चाचणी १0 सप्टेंबरपासून सुरू होणार होती.

मुंबई : एसी लोकलची चाचणी करण्यासाठी मध्य रेल्वेला अद्यापही मुहूर्त मिळालेला नाही. ही चाचणी १0 सप्टेंबरपासून सुरू होणार होती. एसी लोकलच्या सॉफ्टवेअरसाठी लागणारे ‘इंडक्टर मशिन’ बंगळुरूमधून मिळण्यास उशीर लागल्याने हा मुहूर्त टळला होता. त्यात आता कावेरीच्या पाणीवाटपाच्या वादाची भर पडली आहे. बंगळुरूमध्ये तणाव असल्याने, मशिन येण्यास आणखी विलंब होणार असल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांकडून देण्यात आली. कुर्ला कारशेडमध्ये लोकल दाखल झाल्यानंतर, या लोकलची चाचणी ठाणे-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, सॉफ्टवेअरची समस्या निर्माण झाल्याने ही लोकल कारशेडमध्ये अडकून राहिली. गेल्या तीन महिन्यांपासून सॉफ्टवेअरची समस्या सोडविण्याचा प्रयत्न सुरू आहे. या लोकलच्या उंचीमुळे मध्य रेल्वेचे पूल अडथळा ठरत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे एसी लोकल चालविणे आणखीनच कठीण होऊन बसले. याबाबत मध्य रेल्वेचे नवनियुक्त महाव्यवस्थापक अखिल अग्रवाल यांनी एसी लोकलला लागणारी यांत्रिकी साधने ३१ आॅगस्टपर्यंत मुंबईत दाखल होतील, अशी माहिती दिली. १0 सप्टेंबरपासून लोकल चाचणीसाठी सज्ज केली जाईल, असे स्पष्टही केले होते. मात्र, चाचणीची हीदेखील मुदत उलटून गेली आहे.एसी लोकलच्या सॉफ्टवेअरसाठी ‘इंडक्टर मशिन’ महत्त्वाची भूमिका बजावते. हे मशिन येण्यास काही तांत्रिक कारणास्तव उशीर झाला होता. बंगळुरूमधील भेल कंपनीच्या एका विक्रेता युनिटकडून हे मशिन येणार होते, परंतु कावेरी पाणीवाटपाचा वाद पेटल्याने, बंगळुरूमध्ये तणावाचे वातावरण आहे. त्यामुळे सोमवारपर्यंत येणे अपेक्षित असलेले मशिन, मुंबईत येण्यास आणखी तीन ते चार दिवस लागणार असल्याचे सांगण्यात आले. इंडक्टर मशिन आल्यानंतर ते १२ डबा एसी लोकलच्या चार मोटरकोचमधील प्रत्येक मोटरकोचमध्ये बसवण्यात येईल आणि त्यानंतर एसी लोकल चाचणीसाठी सज्ज होईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.