दादर, माहिम, धारावीत ज्वेलरी, पेट्रोलपंपाच्या कर्मचाऱ्यांची चाचणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2020 04:06 AM2020-12-26T04:06:52+5:302020-12-26T04:06:52+5:30
मुंबई : मुख्य बाजारपेठ व सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या जी उत्तर विभागात नेहमीच गर्दी असते. पुनश्च हरिओमनंतर दादर, माहिम ...
मुंबई : मुख्य बाजारपेठ व सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या जी उत्तर विभागात नेहमीच गर्दी असते. पुनश्च हरिओमनंतर दादर, माहिम परिसरात लोकांची वर्दळ वाढली आहे. त्यामुळे दादर, माहिम आणि धारावीतील पेट्रोल पंप, बेकरी, ज्वेलरी, डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी विशेष कोरोना चाचणी शिबिरे आयोजित करण्यात आली आहेत. २९ डिसेंबरपर्यंत ही मोहीम सुरू राहणार असून पालिका पाच ठिकाणी शिबिरे घेणार आहे.
‘चेज द व्हायरस’, ‘मिशन झीरो’, राज्य सरकारचे ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ अशा मोहिमा राबवत महापालिकेने कोरोनाचा प्रसार रोखण्यात यश मिळविले आहे. सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीत आता अवघे १२ सक्रिय रुग्ण उरले आहेत. तर शुक्रवारी येथे एकाही नवीन रुग्णाची नोंद झाली नाही. दादर आणि माहिममध्येदेखील रुग्णसंख्या नियंत्रणात आहे. मात्र सावधगिरीची उपाययोजना म्हणून पालिकेने या विभागांमध्ये कोरोना चाचणी सुरू ठेवली आहे.
दिवाळीच्या काळात येथील बाजारपेठेत गर्दी झाल्याच्या पार्श्वभूमीवर दुकानदार आणि फेरीवाल्यांसाठी महापालिकेने विशेष कोरोना चाचणी शिबिरे आयोजित केली होती. त्यानंतर आता लोकांच्या अधिक संपर्कात येणाऱ्या पेट्रोल पंप, बेकरी, दागिन्यांची दुकाने आणि डिपार्टमेंटल स्टोअर्समधील कर्मचाऱ्यांसाठी शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. जी/उत्तर विभागातील दादर, माहिममध्ये मेट्रो-३ चे काम सुरू आहे. या कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी २६ डिसेंबर रोजी होणार आहे.