Join us

मुंबई ते गुजरात जलवाहतुकीसाठी चाचपणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 4:05 AM

वाहतूक कोंडीवर उतारा; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्टलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबई ते गुजरातदरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासाठी ...

वाहतूक कोंडीवर उतारा; डिसेंबरपर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : मुंबई ते गुजरातदरम्यान जलवाहतूक सुरू करण्यासाठी केंद्रीय नौकानयन आणि जलवाहतूक मंत्रालयाने चाचपणी सुरू केली असून, मुंबई पोर्ट ट्रस्टला नोडल एजन्सी बनविण्यात आले आहे. डिसेंबरपर्यंत ही वाहतूक सुरू होऊ शकते, अशी माहिती सूत्रांनी दिली.

मुंबई ते रायगडदरम्यान सुरू असलेल्या वॉटर टॅक्सी आणि रोपॅक्स सुविधेच्या कामाबाबत केंद्रीय नौकानयन मंत्री मनसुख मंडाविया यांनी नुकतीच बैठक घेतली. यावेळी मुंबई ते गुजरातदरम्यान जलवाहतूक सुरू करण्याबाबतही चर्चा झाली. सुरत ते दीवपर्यंत प्रवासी जलवाहतूक सुरू करण्यात आली आहे. त्याला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळत आहे. या सेवेचा मुंबईपर्यंत विस्तार केल्यास रस्ते आणि रेल्वे वाहतुकीवरील भार बऱ्यापैकी कमी होऊ शकतो. शिवाय जलपर्यटनाच्या सुविधाही निर्माण केल्या जाऊ शकतात, अशी भूमिका मंडाविया यांनी यावेळी मांडली.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई ते सुरत आणि मुंबईत ते हाझिरा या दोन मार्गांवर जलवाहतूक सुरू करण्याबाबत अभ्यास सुरू आहे. डिसेंबर २०२१ पर्यंत ही सुविधा उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठरविण्यात आले आहे. यासाठी आवश्यक टर्मिनलची उभारणी आणि अन्य तयारी करण्याचे आदेश मुंबई पोर्ट ट्रस्टला देण्यात आले आहेत. या मार्गावर प्रवासी वाहतुकीसह जलपर्यटनाच्या दृष्टीने सुविधा उभारण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना पोर्ट ट्रस्टला देण्यात आल्या आहेत.

* असा हाेणार फायदा

- मुंबई ते गुजरातदरम्यान दररोज ये-जा करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. सर्वाधिक प्रवासी रेल्वे आणि रस्ते मार्गाने प्रवास करतात. रस्त्यावरील वाहतूक कोंडी आणि रेल्वेची प्रतीक्षा यादी यापासून प्रवाशांची मुक्तता करायची असल्यास जलवाहतूक हा प्रभावी पर्याय ठरू शकतो.

- वेळेची बचत होणार असल्याने या सेवेला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळण्याचा विश्वास केंद्रीय नेतृत्वाला आहे. शिवाय पर्यटनाच्या सुविधा निर्माण केल्यास महसुलाचा स्त्रोतही निर्माण होऊ शकतो. त्यामुळे शक्य तितक्या लवकर हे दोन्ही जलमार्ग सुरू करण्यासाठी हालचाली सुरू असल्याचे सूत्रांनी सांगितले.

--------------------------------------