कंत्राटदारांची नियुक्ती : लवकरच कामांना हाेणार सुरुवात
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मुंबई ते नागपूरपर्यंतच्या वेगवान प्रवासाचे स्वप्न साकार करणारा समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा मे, २०२१ पासून सुरू होत असताना या दोन शहरांना जोडणाऱ्या प्रस्तावित बुलेट ट्रेनची चाचपणीही सुरू झाली आहे. या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची पूर्वप्राथमिक चाचपणी करण्यासाठी नॅशनल हाय स्पीड रेल काॅर्पोरेशनने (एनएचएसआरसीएल) कंत्राटदारांची नियुक्ती केली आहे.
मुंबई-नाशिक-नागपूर असा ७४१ किमी लांबीचा हाय स्पीड रेल्वेमार्ग केंद्र सरकारने प्रस्तावित केला आहे. बहुतांश ठिकाणी ही ट्रेन समृद्धी महामार्गाला समांतर धावणार आहे. शहापूर, इगतपुरी, नाशिक, शिर्डी, औरंगाबाद, जालना, मेहकर, मालेगाव, जहांगिरी, करंजा, पुलगाव, वर्धा आणि नागपूर अशी १२ स्थानके उभारली जातील. या प्रकल्पाच्या कामाची विभागणी पाच टप्प्यांमध्ये करण्यात आली आहे.
मार्गिकेचा अंतिम आराखडा ठरविणे, या मार्गावर बुलेट ट्रेन सुरू झाल्यानंतर तिथल्या प्रवासाला किती प्रवासी प्राधान्य देतील याचा अंदाज मांडणे, जनरल अरेंजमेंट ड्राॅंइंग (जीएडी) आणि सामाजिक परिणामांचा आलेख मांडणे अशा प्राथमिक कामांसाठी एनएचएसआरसीएलने निविदा काढल्या होत्या. ती प्रक्रिया आता पूर्ण झाली असून लवकरच कामांना सुरुवात होणार आहे. पुढील सहा महिन्यांत त्याबाबतचे अहवाल एनएचएसआरसीएलला प्राप्त होतील. त्यानंतर या मार्गाची पुढील दिशा ठरवली जाईल. पर्यावरणावर होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी काढलेल्या निविदांचे वित्तीय देकार अद्याप उघडण्यात आलेले नाहीत.
* आराखड्यासाठी चार काेटींचा खर्च
मार्गिकेचा अंतिम आराखडा ठरविण्याचे काम सीकाॅन प्रा. लि. ही कंपनी करणार असून त्यासाठी १४ कोटी २५ लाख रुपये मोजले जातील. सामाजिक परिणामांचा सविस्तर अहवाल आणि पुनर्वसनाचा आराखडा तयार करण्याचे काम मोनार्च कंपनीला मिळाले असून त्यावरील खर्च ४ कोटी ४९ लाख रुपये आहे. दिल्ली इंटिग्रेटेड मल्टिमोडल ट्रान्झिट सिस्टिम या कंपनीला ट्राफिक सर्व्हेचे काम (४४ लाख रुपये) मिळाले आहे. जनरल अरेंजमेंट ड्राॅइंगचे काम होल्टेक या कंपनीला मिळाले असून तो खर्च २९ लाख रुपये आहे. डेटा कलेक्शन आणि अन्य संलग्न कामांचा डीपीआर सत्रा सर्व्हिसेस ही कंपनी (३९ लाख) करणार आहे.
............................