‘टीबी’ विरोधातील लसीची चाचणी सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 09:28 AM2024-09-05T09:28:32+5:302024-09-05T09:28:32+5:30
मुंबई : क्षयरोगाविरोधातील मोहिमेंतर्गत राज्यात मुंबई वगळता विविध ४० ठिकाणी मंगळवारपासून बीसीजी लसीकरणाच्या चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे. त्यात ...
मुंबई : क्षयरोगाविरोधातील मोहिमेंतर्गत राज्यात मुंबई वगळता विविध ४० ठिकाणी मंगळवारपासून बीसीजी लसीकरणाच्या चाचणीला सुरूवात करण्यात आली आहे. त्यात अवघ्या दोन दिवसांत सुमारे २५ हजार नागरिकांवर या लसीची चाचणी करण्यात आली आहे. मात्र, आशा आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपामुळे क्षयरुग्णांचे सर्वेक्षण पूर्ण न झाल्याने मुंबईकरांना या मोहिमेसाठी आता प्रतीक्षा करावी लागणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २०२५ पर्यंत देश टीबीमुक्त करण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार क्षयरोग प्रतिबंधासाठी बीसीजी लसीची प्रौढांवर चाचणी सुरू करण्यात आली आहे. याबाबत राज्य क्षयरोग निर्मूलन अधिकारी डॉ. संदीप सांगळे यांनी सांगितले की, या मोहिमेत पहिल्या दोन दिवसांत १८ वर्षांवरील २५ हजार लोकांना लस देण्यात आली आहे. या लसीकरणानंतर लाभार्थ्यांवर तीन वर्षे लक्ष ठेवून लसीची परिणामकारकता तपासण्यात येणार आहे. दरम्यान, मुंबईतील २४ वॉर्डांपैकी १२ ठिकाणी बीसीजी लसीची चाचणी घेण्यात येणार असून, येथील सर्वेक्षणाचे काम अद्याप पूर्ण झाले नसल्याचे मुंबई महापालिका आरोग्य विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याकडून सांगण्यात आले.