लक्षणे असतील तरच होणार चाचणी; मुंबई महापालिकेने बदलले मार्गदर्शक तत्त्वे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 07:57 AM2022-01-13T07:57:25+5:302022-01-13T07:57:31+5:30

मुंबईत मागील दोन दिवसांपासून ११ ते १३ हजारांवर आलेली दैनंदिन रुग्णसंख्येने बुधवारी पुन्हा १६,४२० चा टप्पा गाठला आहे.

Testing only if there are symptoms; More than 16,000 patients a day in Mumbai | लक्षणे असतील तरच होणार चाचणी; मुंबई महापालिकेने बदलले मार्गदर्शक तत्त्वे

लक्षणे असतील तरच होणार चाचणी; मुंबई महापालिकेने बदलले मार्गदर्शक तत्त्वे

Next

मुंबई :  राष्ट्रीय पातळीवर कोरोना चाचण्यांसंदर्भातील मार्गदर्शक तत्त्वे बदलल्यानंतर आता पालिकेनेही याची अंमलबजावणी सुरू केली आहे. या नव्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, सरसकट कुणाचीही चाचणी करण्यात येणार नाही. केवळ लक्षणे असणाऱ्या व्यक्तींची कोरोना 
चाचणी करण्यात येणार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहर उपनगरांतील पॉझिटिव्हिटी दर वाढण्याची शक्यता आहे, अशी माहिती मुंबई महापालिकेचे आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी दिली.

मुंबईत मागील दोन दिवसांपासून ११ ते १३ हजारांवर आलेली दैनंदिन रुग्णसंख्येने बुधवारी पुन्हा १६,४२० चा टप्पा गाठला आहे, तर ७ मृत्यूंची नोंद झाली आहे; तर दिवसभरात १४,६४९ रुग्ण बरे होऊन घरी गेले असून, एकूण ८ लाख ३४ हजार ९६२ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईतील बरे झालेल्या रुग्णांचा दर ८७ टक्के आहे. ५ ते ११ जानेवारीपर्यंत मुंबईतील एकूण कोविड वाढीचा दर १.८५ टक्के आहे; तर रुग्ण दुप्पट होण्याचा काळ ३६ दिवसांवर आला आहे.

दिवसभरातील १६ हजार रुग्णांपैकी १३ हजार ७९३ रुग्ण लक्षणविरहित आहेत, हे प्रमाण ८४ टक्के आहे. मुंबईत एकूण ९ लाख ५६ हजार २७८ कोरोनाबाधित असून, मृतांचा आकडा १६ हजार ४२० इतका आहे. पालिकेने रुग्णांचा शोध घेण्यासाठी २४ तासांत ६७ हजार ३३९ चाचण्या केल्या असून, एकूण १ कोटी ४३ लाख ९२ हजार ४८३ कोरोना चाचण्या केल्या आहेत. शहर उपनगरात झोपडपट्ट्या आणि चाळींच्या परिसरात सक्रिय प्रतिबंधित क्षेत्र शून्यावर आले आहे, तर सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या ५६ आहे. मागील चोवीस तासांत रुग्णांच्या संपर्कातील १८ हजार ९४५ अतिजोखमीच्या सहवासितांचा शोध घेतला आहे.

क्लोज काँटॅक्ट शोधण्यासाठी महापालिकेचे स्वतंत्र पथक

कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या अतिजोखमीच्या १८,९४५ व्यक्तींचा शोध २४ तासांत घेतला आहे. तर अतिजोखमीच्या संशयित ५४२ जणांना कोविड केंद्रात दाखल करण्यात आले आहे. त्यासाठी महापालिकेने स्वतंत्र पथक तयार केले आहे. या पथकामार्फत बाधित रुग्णांच्या संपर्कातील व्यक्तीचा शोधून त्यांचे विलगीकरण करण्यास प्राधान्य दिले जात आहे. 

राज्यात २४ तासांत ४६ हजारांहून अधिक रुग्ण

राज्यात बुधवारी ४६,७२३ नवीन रुग्णांचे निदान झाले असून ३२ कांरोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली आहे. राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या वाढून  २,४०,१२२ गेली आहे. तर दुसरीकडे दिवसभरात २८,०४१ रुग्ण बरे होऊन घरी परतले असून एकूण ६६,४९,१११ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.  राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९४.५२% एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्युदर २.०१% एवढा आहे. 

Web Title: Testing only if there are symptoms; More than 16,000 patients a day in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.