मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणातर्फे मेट्रो २ अ आणि मेट्रो ७ चे काम वेगाने सुरू असून, गुरुवारी चारकोप आगारात एकत्रित सहा डब्यांच्या ट्रेनची डायनॅमिक कमी वेगात ५२० मीटर अंतराची चाचणी घेण्यात आली, तर मार्चमध्ये दुसऱ्या ट्रेन संचाचे आगमन झाल्यावर रेल्वेची सिग्नलिंगसह एकत्रित समांतर चाचणी सुरू होईल.
मेट्रोचा पहिला डबा २८ जानेवारीला चारकोप डेपोत आला. या पहिल्या पहिल्या मेट्रोच्या डब्यांचे अनावरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. एमआरएसच्या दिलेल्या कंत्राटानुसार बीईएमएल कंपनीकडून एकूण ९६ ट्रेन पुरविण्यात येणार आहेत. यातील ही १ पहिली ट्रेन आहे. याद्वारे ‘मेक इन इंडिया’ उपक्रमास चालना दिली जात आहे.
बीईएमएल अभियंत्यांद्वारे चारकोप येथील मेट्रो डब्यांची गाड्यांची तपासणी करण्यात आली. हार्ड-वायर्ड कमांडचा उपयोग करून ऊर्जा आणि मर्यादित हालचालीसाठी ६ मेट्रो डब्यांचे ३-३ डब्यांमध्ये दोन विभागांत विभाजित करण्यात आले आहे. यासाठी, पॅनटोग्राफ कंट्रोल्स, प्रोपल्शन आणि ब्रेक सिस्टीमसह ट्रेनची उच्च विद्युत पुरवठा प्रणालीची काही भागात चाचणी घेण्यात आली.
...त्यानंतर सुरू हाेणार पुढील चाचण्या
वाहन नियंत्रण सर्किट, टीसीएमएस नियंत्रणे आणि भिन्न उपप्रणालींसह इंटरफेस, शोर सप्लाय, उच्च व्होल्टेज, ब्रेक सिस्टीमसह प्रपल्शन फाइन ट्यूनिंग, सहायक ऊर्जा पुरवठा, ब्रेक्स आणि न्यूमेटिक्स, डोअर सिस्टीम, एअरसारख्या विविध उपप्रणालींची कार्यक्षमता कंडिशनिंग, लाइटिंग, पॅसेंजर घोषित करणे आणि पॅसेंजर इनफॉरमेशन सिस्टीम (पीए-पीआयएस) आदी प्रत्येक उपप्रणालीची आगारात एकत्रित ट्रेन चाचणीद्वारे स्वतंत्रपणे पडताळणी करण्यात येणार आहे. याकरिता एक महिना लागेल. मुख्य मार्गाला जोडणी झाल्यावर ट्रेन फील्ड चाचण्या सुरू होतील.