लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई : डी. एन. नगर ते मंडाळे मेट्रो २ ब मार्गिकेचा पहिला टप्पा डिसेंबरपर्यंत प्रवाशांच्या सेवेत आणण्याच्या अनुषंगाने पावले उचलण्यास मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने सुरुवात केली आहे. या मेट्रो मार्गिकेवरील मंडाळे ते चेंबूर या ५.६ किमी लांबीच्या मार्गावरील मेट्रोच्या ओव्हर हेड वायरवरील विद्युत प्रवाह येत्या मंगळवारपासून सुरू केला जाणार आहे. त्यामुळे या मेट्रो मार्गिकेवर गाडीच्या चाचण्यांना सुरुवात करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
डी. एन. नगर ते मंडाळे ‘मेट्रो २ बी’ मार्गिका २३.६ किलोमीटरची असून, त्यावर १९ स्थानके आहेत. या मार्गिकेसाठी सुमारे १०,९८६ कोटींचा खर्च अपेक्षित आहे. एमएमआरडीएच्या यापूर्वीच्या नियोजनानुसार ‘मेट्रो २ बी’चे काम ऑक्टोबर २०२२ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, कामाची अपेक्षित गती न गाठल्याने तीन पॅकेजमधील कंत्राटदार बदलण्याची वेळ एमएमआरडीएवर आली. यातील दोन पॅकेजमधील कंत्राटदारांची २०२१ मध्ये नियुक्ती करण्यात आली होती, तर या प्रकल्पातील बीकेसी एमटीएनएल ते चेंबूर डायमंड गार्डन या पॅकेज १०२ मध्ये दोन वर्षांनी कंत्राटदाराची नियुक्ती केली होती. त्यावेळी या प्रकल्पाचे केवळ २.३५ टक्के काम पूर्ण झाले होते.
प्रकल्पाला गती या प्रकल्पाच्या कामाने गती पकडली आहे. प्रकल्पाची ७९ टक्के स्थापत्य कामे पूर्ण झाली आहेत, तर मंडाळे कारशेडचे ९७ टक्के काम पूर्ण झाले आहे. हे कारशेड सुमारे ३१.४ हेक्टर जागेवर आहे. कारशेडमधील विद्युत प्रवाहही सुरू केला जाणार आहे. त्यामुळे मंडाळे ते चेंबूर या मार्गावर दोन्ही वाहिन्यांचा विद्युत प्रवाह सुरू केला जात आहे. त्यामुळे कारशेड आणि मंडाळे ते चेंबूर मार्गावर चाचण्यांना लवकरच सुरुवात होईल.
असा आहे प्रकल्पएकूण लांबी - २३.६ किमीस्थानके - १९ पहिला टप्पा - मंडाळे ते डायमंड गार्डन पहिल्या टप्प्यातील मार्गाची लांबी - ५.३ किमी
ही असतील स्थानकेमंडाळे, मानखुर्द, बीएसएनएल, शिवाजी चौक, डायमंड गार्डन